देशभरात सुरु असेलेला भारत बंद (Bharat Bandh) हा राजकीय नाही. हा बंद शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आहे. या बंदमध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही. कोणत्याही पक्षाचा वेगळा झेंडा या बंदमध्ये नाही. त्यामुळे या बंदला जगभरातून पाठिंबा मिळतो आहे. केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी आणि महाराष्ट्रातील विरोधकांनी याचा विचार करावा, असे शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. आपल्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी आंदोलन करत असल्याचेही राऊत यांनी (Farmers Protes) म्हटले आहे.
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले, कोणताही शेतकरी नेता हा शेतकऱ्यांच्या भूमिकेशी सहमत असतो. आज केंद्र सरकार आणि त्यांचे समर्थक 10 वर्षांपूर्वी काय झाले. 20 वर्षांपूर्वी काय झाले हे सांगत आहेत. परंतू, इतिहासाचे खोदकाम करायचे तर गोष्टी खूप दूरपर्यंत जातात. त्यामुळे आजचे बोला. आज देशातील स्थिती काय आहे. याचा विचार शेतकरी कायद्याचे समर्थन करणाऱ्यांनी करायला हवे, असेही संजय राऊत यांनी या वेळी म्हटले.
आपले हक्क आणि स्वातंत्र्य देण्यासाठी शेतकरी दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकून थांबले आहेत. त्यांच्या भावना आणि हक्क याचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे या बंदला आपण पाठिंबा द्यायला हवा. हा बंद कोणत्याही प्रकारे हातात हंटर (डंडा) घेऊन करण्यात आला नाही. त्यासाठी कोणाच्याही हातात हंटर नाही. खरेतर हंटर केंद्र सरकारच्या हातात आहे. त्यामुळे जे लोक या कायद्याचे समर्थन करत आहेत त्यांनी एकदा स्वत:ची भूमिका पुन्हा एकदा तपासून पाहिली पाहिजे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Bharat Bandh Effect on Maharashtra: शेतक-यांच्या 'भारत बंद' मध्ये महाराष्ट्रात आज काय सुरु, काय बंद राहणार; जाणून घ्या सविस्तर)
केंद्र सरकारने संमत केलेले कृषी कायदे परत घ्यावे या मागणीसाठी राजधानी दिल्ली येथे शेतकरी आंदोलन करत आहेत. हे आंदोलन आता अधिक तीव्र झाले आहे. हे आंदोलन भारतभर पसरविण्यासाठी आणि सरकारचे लक्ष शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे वेधण्यासाठी आज (8 डिसेंबर) भारत बंदचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील सुमारे 40 पेक्षाही अधिक संघटना या बंधमध्ये सहभागी झाल्या आहेत. सकाळी 8 ते दुपारी 3 या कालावधीत हा बंद शांततेच्या मार्गाने केला जाणार आहे. आज सकाळी 8 वाजलेपासून बंदला सुरुवात झाली आहे.
शेतकऱ्यांच्या बंदला महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी आगोदरच पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे या बंदला महाविकासआघाडी सरकारचाही अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचे स्पष्ट आहे. शिवाय आजच्या भारत बंदला माथाडी कामगारांनीही पाठिंबा दिला आहे. त्यासोबत एपीएमसी मार्केट नवी मुंबई यांचाही बंदला पाठिंबा आहे. त्यामुळे आज एपीएमसी मार्केट बंद राहतील, असे कालच स्पष्ट करण्यात आले आहे.