Representational Image (Photo Credit: PTI)

आजकाल दिवसेंदिवस सेक्सटॉर्शनची (Sextortion) प्रकरणे समोर येत आहेत. अशाच एका प्रकरणात एका व्यक्तीकडून तब्बल 2.7 कोटी रुपये उकळण्यात आले आहेत. हे धक्कादायक प्रकरण गुजरातमधील अहमदाबादचे (Ahmedabad) आहे, जिथे एक 68 वर्षीय व्यापारी सेक्सटॉर्शनचा बळी ठरला आहे. ऑगस्ट 2022 ते डिसेंबर 2022 दरम्यान, 11 वेगवेगळ्या लोकांनी या व्यक्तीकडून 2.8 कोटी रुपये उकळले आहेत.

सेक्सटोर्शन म्हणजे लोकांना फसवून व्हॉट्सअॅप किंवा तत्सम व्हिडीओ कॉलिंग अॅपवर व्हिडिओ कॉल केले जातात. अशा कॉलवर लोकांच्या अश्लील क्लिप बनवून, त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करून पैसे वसूल केले जातात. आता अहमदाबादमधील व्यापारी अशाच कृत्याला बळी पडला आहे.

पीडितेच्या तक्रारीनुसार, हा संपूर्ण घोटाळा त्याच्यासोबत 8 ऑगस्ट रोजी सुरू झाला. पीडितेने सांगितले की, 8 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्याला रिया शर्मा नावाच्या महिलेचा फोन आला. तिने ती मोरबी येथील असल्याचे सांगितले. या संभाषणामध्ये तिने पिडीत व्यक्तीला व्हिडीओ कॉलवर आपले कपडे कपडे काढण्यास राजी केले. त्यानंतर तिने व्हिडिओ कॉल केला. या कॉलवर पिडीतेने कपडे काढल्यानंतर काही सेकंदांनी रियाने अचानक फोन कट केला.

यानंतर तरुणीने फोन करून पीडितेकडे 50 हजार रुपयांची मागणी केली व हे पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. याला घाबरून पीडितेने तात्काळ मुलीला 50 हजार रुपये दिले. काही दिवसांनंतर, पीडितेला एका व्यक्तीचा फोन आला ज्याने आपण दिल्ली पोलिसांचे इन्स्पेक्टर गुड्डू शर्मा असल्याचे सांगितले. ती व्हिडिओ क्लिप आपल्याकडे असल्याचा दावा करत त्याने 3 लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर आणखी एका व्यक्तीने फोन करून 80 लाख रुपये उकळले. अशा प्रकारे विविध लोकांनी पिडीत व्यक्तीकडून 2.70 कोटी रुपये वसूल केले. (हेही वाचा: मुंबई मध्ये प्रतिष्ठित शाळेचे मुख्याध्यापक Sextortion च्या जाळ्यात, मेसेंजरवर न्यूड व्हिडिओ कॉल)

अखेर, पिडीतेने 10 जानेवारी रोजी सायबर गुन्हे शाखा पोलिसांत धाव घेऊन, 11 जणांविरुद्ध तक्रार दाखल केली. आता या सर्वांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 387, 170, 465, 420 आणि 120-बी अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.