Schengen Visa New Rules: युरोपियन युनियनच्या (European Union) देशांमध्ये वरचेवर प्रवास करणाऱ्या भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय नागरिक आता दीर्घ वैधतेसह एकाधिक प्रवेश (Multiple-Entry) शेंगेन व्हिसासाठी (Schengen Visas) अर्ज करू शकतात. युरोपियन युनियनने यासंबंधी काही नियम बदलले आहेत. नवीन नियमानुसार आता पाच वर्षांसाठी मल्टिपल एंट्री शेंजेन व्हिसासाठी अर्ज करता येईल. युरोपीय देशांत जाण्यासाठी तुमच्याजवळ शेंजेन व्हिसा असणे आवश्यक आहे. या व्हिसाच्या माध्यमातून पर्यटक विविध युरोपीय देशांना भेट देऊ शकतात. शेंजेन व्हिसा हा आतापर्यंत 90 दिवसांपर्यंत जारी केलेला 'शॉर्ट स्टे' व्हिसा होता.
युरोपियन कमिशनने 18 एप्रिल रोजी भारतीय नागरिकांना एकाधिक प्रवेश व्हिसा जारी करण्यासाठी नवीन नियम स्वीकारले. 18 एप्रिलपासून लागू होणारी ही नवीन प्रणाली भारतीय प्रवाशांसाठी अतिशय फायदेशीर आहे. नवीन नियमांनुसार, भारतात राहणा-या भारतीय नागरिकांना कायदेशीररीत्या गेल्या तीन वर्षांत दोन व्हिसा प्राप्त केल्यानंतर आणि वापरल्यानंतर, दोन वर्षांसाठी वैध असलेला दीर्घकालीन, मल्टी-एंट्री शेंगेन व्हिसा जारी केला जाऊ शकतो.
पासपोर्टची वैधता शिल्लक असेल तर, हा प्रारंभिक दोन वर्षांचा व्हिसा त्यानंतर पाच वर्षांचा होऊ शकतो. या विस्तारित वैधतेमुळे प्रवाशांना कोणत्याही 180-दिवसांच्या कालावधीत 90 दिवसांपर्यंत शेंगेन परिसरात मुक्तपणे फिरता येईल. या व्हिसाद्वारे एकूण 29 देशांमध्ये प्रवास करता येतो. शेंगेन क्षेत्रामध्ये 29 युरोपीय राज्ये आहेत, त्यापैकी 25 युरोपियन युनियन देश आहेत. (हेही वाचा: 'पुढील 5 वर्षांत प्रवाशांना किमान आरामात कंफर्म तिकीट मिळेल इतकी सुविधा सुधारणार ही मोदींची गॅरेंटी')
या देशांमध्ये बेल्जियम, बल्गेरिया, क्रोएशिया, झेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, जर्मनी, एस्टोनिया, ग्रीस, स्पेन, फ्रान्स, इटली, लॅटव्हिया, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, हंगेरी, माल्टा, नेदरलँड, ऑस्ट्रिया, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, स्लोव्हेनिया, स्लोव्हाकिया, फिनलंड, स्वीडन, आइसलँड, लिकटेंस्टीन, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड यांचा समावेश आहे. दरम्यान, तुम्ही ज्या देशाला भेट देऊ इच्छिता त्या देशाच्या वाणिज्य दूतावासात तुम्ही शेंजेन व्हिसासाठी अर्ज सबमिट केला पाहिजे. जर तुमचा एकापेक्षा जास्त शेंगेन देशांना भेट द्यायची असेल, तर तुम्ही त्या देशाच्या वाणिज्य दूतावासात अर्ज करावा जिथे तुम्ही सर्वात जास्त कालावधी व्यतीत करणार आहात. लक्षात घ्या हा व्हिसा तुम्हाला या देशांमध्ये काम करण्याचा अधिकार देत नाहीत.