संस्कृत भाषेत बोलल्याने मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल कमी होतो; भाजप खासदार गणेश सिंह यांचा अजब दावा
BJP MP Ganesh Singh (Photo Credits: Twitter/Ganeshsingh_in)

नवी दिल्ली: भाजप खासदार (BJP MP) गणेश सिंह (Ganesh Singh) यांनी गुरुवारी लोकसभेत संस्कृत युनिव्हर्सिटी (Sanskrit University)  संदर्भातील विधेयकावर भाषण करत असताना अमेरिकन शैक्षणिक संस्थांच्या अभ्यासाचे दाखले देत संस्कृत भाषेत संभाषण केल्याने मधुमेह (Diabetes) व कॉलेस्ट्रॉलचा (Cholestrol) आजार कमी होत असल्याचा दावा केला आहे. इतकेच नव्हे तर चक्क अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा (NASA) ने सुद्धा संस्कृत मध्ये कॉम्प्युटर कोडींग (Coding) केल्यास ते अगदी अचूक होईल असे सांगितल्याचे सिंह यांनी म्हंटले आहे. संस्कृत या भाषेचे अस्तित्व जगभरात आहे असे सांगताना सिंह म्हणतात की, जगातील 97% भाषा ज्यामध्ये इस्लामिक भाषांचा सुद्धा समावेश आहे, त्यांची बांधणी ही संस्कृतच्या आधारे करण्यात आली आहे, त्यामुळे सर्वांचे मूळ असणारी ही भाषा अधिकाधिक पसरवलीच गेली पाहिजे.

हॉलिवूड गायिका लेडी गागा हिने 'लोकाः समस्ताः सुखिनोभवंतु' संस्कृत श्लोक ट्वीट केल्याने युजर्स बुचकळ्यात, काय आहे नेमका अर्थ?

गणेश सिंह यांच्याशिवाय या विधेयकाला केंद्रीय मंत्री प्रताप चंद्र सारंगी यांनी देखील पाठिंबा दर्शवला.या विधेयकावर संस्कृत मध्येच भाषण देताना त्यांनी ही अत्यंत लवचिक भाषा असून एकाच वाक्यातून अनेक अर्थ दाखवता येत असल्याचे म्हंटले आहे. तसेच इंग्रजी मधील काही संकल्पना या संस्कृत भाषेच्या संस्कृतीवर आधारित आहेत त्यामुळे या प्राचीन भाषेचा प्रसार केल्याने कोणत्याही अन्य भाषेला धक्का लागणार नाही असेही सारंगी यांनी सांगितले.

दरम्यान, यापूर्वी सुद्धा केंद्रीय मानव संसाधन विकास (HRD) मंत्री रमेश पोखरियाल यांनी सुद्धा संस्कृत ही अत्यंत वैज्ञानिक भाषा असून भविष्यात याच भाषेचा उपयोग करून मानवी क्रिया करणारी तंत्रज्ञान बनवता येईल असा विश्वास व्यक्त केला होता.