केंद्रीय मंत्री रमेश पोखरीयाल यांचा NASA च्या नावावर अजब दावा; संस्कृत भाषेमुळे भविष्यात येतील बोलणारे संगणक
HRD Minister Ramesh Pokhriyal (Photo Credits: ANI)

केंद्रीय मानव संसाधन विकास (HRD) मंत्री रमेश पोखरियाल (Ramesh Pokhriyal) हे शनिवारी, आयआयटी मुंबईच्या (IIT- Bombay) 57 व्या पदवीप्रदान सोहळ्यासाठी उपस्थित होते. यावेळी भाषण करताना पोखरीयाल यांनी असा काही दावा केला आहे की जो ऐकून विद्यार्थीही चक्रावून गेले. पोखरीयाल यांच्या म्हणण्यानुसार भविष्यात जर का तुम्हाला आजूबाजूला बोलणारे संगणक पाहायला मिळाले तर ते संस्कृत (Sanskrit) भाषेमुळे शक्य होणार आहे, आणि हे फक्त त्यांचेच मत नसून स्वतः नासा (NASA) (नॅशनल एरोनॉटिक्स एंड स्पेस एडमिनिस्ट्रेशन) ने सुद्धा या विधानाची पुष्टी केली आहे असेही ते म्हणाले.

या विधानानंतर पोखरीयाल यांनी आपली विशेष कारणे सुद्धा सर्वांसमोर मांडली. संस्कृत ही एक वैज्ञानिक भाषा आहे, ती ज्याप्रमाणे बोलली जाते त्याप्रमाणे लिहिली जाते यामुळेच बोलणारे संगणक अबनवायचे झाल्यास या भाषेची मदत होईल असे विधान पोखरीयाल यांनी नासाची ग्वाही देत केले आहे.

ANI ट्विट 

दरम्यान, पोखरीयाल यांनी आपल्या भाषणात संस्कृत ही जागतिक सर्वात जुनी आणि एकमेव वैज्ञानिक भाषा असल्याचा सुद्धा दावा केला आहे. याची सोदाहरण पुष्टी करताना त्यांनी जगात अणू- परमाणूचा शोध लावण्यात चक्र ऋषी यांचा मोलाचा वाटा होता, त्यांची आयुर्वेदातील कामगिरी सर्वज्ञात आहे, याचप्रमाणे सुश्रुत हा जगातील पहिला सर्जन आहे अशी माहिती दिली. त्याकाळी भारतात संस्कृत भाषा प्रचलित होती त्यामुळे या व्यक्तींनी विज्ञानाचे शोध लावताना याच भाषेचा वापर केला असणार ज्यावरून ही जागतिक सर्वात जुनी वैज्ञानिक भाषा होते असा युक्तिवाद पोखरीयाल यांना करायचा होता. मात्र या विधानात किती तथ्य आहे याचा खुलासा अद्याप झालेला नाही.