Rain | Representational image (Photo Credits: pxhere)

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाच्या (Unseasonal Rain) सरी कोसळत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांना गारपीटीने तडाखा दिलाय. त्यामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झालंय. हवामान खात्याने (IMD) आजही राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. मंगळवारी आणि बुधवारी राज्यातील विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो, असा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील 48 तासांत विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता (Rain Alert) वर्तवण्यात आली आहे.  (Maharashtra Rain Alert: विदर्भ, मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज)

विदर्भात पुढील 2-3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता असून मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मराठवाड्यातही जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात मात्र ढगाळ वातावरण राहील, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.