Rahul Gandhi in Lok Sabha: राहुल गांधी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र म्हणाले 'सरकार केवळ 'हम दो, हमारे दो' यांच्यासाठी काम करतंय'
Rahul Gandhi in Lok Sabha | ( Photo Credits: Twitter/ ANI)

काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडत राहुल गांधी यांनी म्हटले काही वर्षांपूर्वी 'हम दो हमारे दो' असा एक लोगो यायचा. यात काही मोठे-मोठे चेहरे दिसायचे. आताही तसेच आहे देशात सर्व काही चालले आहे ते केवळ हम दो हमारे दो यांच्यासाठीच चालले आहे. आज केवळ चार लोकच देश चालवत आहेत. राहुल गांधी यांनी कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलन आणि रोजगाराच्या मुद्द्यावरुन सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केले.

राहुल गांधी यांनी म्हटले की, आज देशात रोजगारनिर्मीती होत नाही. उद्याही नाही होणार. कारण केंद्र सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडेच मोडले आहे. देशात सुरु असलेले आंदोलन केवळ शेतकऱ्यांचे नाही. हे आंदोलन सर्व देशाचे आहे. शेतकरी देशाला दिशा दाखवत आहेत. ते अंधारामध्ये दिवा घेऊन उभे आहेत. (हेही वाचा, India- China Border Dispute: भारत-चीन सीमावाद निवळण्याची चिन्हे, पैंगोंग लेक येथून दोन्ही देशांचे सैन्यदल मागे हटले- राजनाथ सिंह)

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, देश सध्या 'हम दो, हमारे दो' याच सिद्धांतावर चालले आहे. भाजप प्रणीत एनडीए सरकारवर निशाणा साधताना राहुल गांधी यांनी म्हटले की, हा सिद्धांत आपल्यासमोर नोटबंदी, गुड्स एंड सर्विस टेक्‍स (GST) आणि सध्या ज्याच्यामुळे शेतकरी आंदोलन सुरु आहे त्या कृषी कायद्यामुळे पुढे आला. आज कृषी कायद्याविरोधात देशभरात आवाज उठतो आहे.

'हम दो हमारे दो' या घोषवाक्याला केंद्र सरकारने आज नवा अर्थ दिला आहे. आजच्या स्थितीत देश केवळ चार लोकांद्वारेच चालवला जात आहे. राहुल गांधी यांनी चार लोक असा उल्लेख करताना कोणाचेही नाव घेतले नाही. मात्र, हे चौघे कोण हे देशातील जनता पाहात आहे असे ते म्हणाले. शेतकरी आंदोलनाने दाखवून दिले आहे की केंद्र सरकार चुकीच्या दिशेने काम करत आहे. त्यामुळे शेतकरी योग्य तो मार्ग दाखवत आहेत.