Rahul Gandhi | (Photo Credit- Facebook)

काँग्रेसचे खासदार व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी (23 जुलै) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शांततेचे मध्यस्थ म्हणून वारंवार केलेल्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित केला. "ते (ड्रम्प) इतक्या वेळा असे का म्हणत आहेत?" असा सवाल राहुल गांधी यांनी केला. यापूर्वी, काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला की, त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी 'Ceasefire' घडवून आणले आहे. रमेश यांनी सांगितले की, ट्रम्प यांच्या या दाव्यांनी 73 दिवसांत 25 वेळा पुनरुच्चार करत 'सिल्व्हर जुबली' गाठली आहे. केंद्र सरकारवर टीका करताना त्यांनी म्हटले की, पहलगाव दहशतवादी हल्ला व त्यानंतरच्या ऑपरेशन सिंदूरवरील संसदीय चर्चेसाठी निश्चित तारीख सरकारने जाहीर केलेली नाही.

पहलगाम-सिंदूर चर्चेसाठी नकार?

जयराम रमेश यांनी X वर पोस्ट करताना म्हटले की, मोदी सरकारने संसदेतील पहलगाम-सिंदूरवरील चर्चेसाठी तारीख देण्यास आणि पंतप्रधानांच्या उत्तरास नकार दिला आहे. अशा वेळी ट्रम्प यांनी 73 दिवसांत 25 वेळा दावा केला आहे. पण भारताचे पंतप्रधान पूर्णपणे शांत आहेत. त्यांना फक्त परदेश दौरे आणि देशातील लोकशाही संस्था अस्थिर करण्यासाठी वेळ मिळतो. (हेही वाचा, Monsoon Session 2025: लोकसभेत विरोधकांना बोलू दिले जात नाही; राहुल गांधी यांचा आरोप)

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार करारांबाबत बोलताना पुन्हा दावा केला की, त्यांनी भारत-पाकिस्तानमधील संभाव्य युद्ध थांबवले. त्यांनी म्हटले आहे की, आम्ही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबवले. ते कदाचित आण्विक युद्धाच्या मार्गावर होते. मागील हल्ल्यात 5 विमानं पाडली गेली होती. मी त्यांना सांगितले की, जर असे चालू राहिले तर व्यापार होणार नाही. दोन्ही देश आण्विक शक्ती असलेले आहेत. ते कुठे थांबले असते कोण जाणे, पण मी थांबवले, असे ट्रम्प म्हणाले.

विरोधकांची मागणी काय?

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत आणि देशासमोर महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करावे, अशी मागणी केली आहे. यात पहलगाव दहशतवादी हल्ला आणि बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाद्वारे राबवलेले स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) अभियान यांचा समावेश आहे. काँग्रेसनेही ऑपरेशन सिंदूरनंतर ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानमध्ये 'ceasefire' घडवल्याच्या पुनरावृत्तीबाबत पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी केली आहे. या मागणीस सरकार किती गांभीर्यान घेते याबाबत उत्सुकता आहे.