Pulwama Terror Attack: 'भारत के वीर' या अॅप किंवा वेबसाईटवरुन शहीदांच्या कुटुंबियांना अशी करा आर्थिक मदत
शहीदांना आर्थिक मदत (File Photo)

Pulwama Terror Attack: आपल्या देशाच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या जवानांनी 14 फेब्रुवारीला झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात आपल्या जीवाची बाजी लावली. जम्मू-काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

सामान्यांपासून दिग्गजांपर्यंत अनेकजण विविध माध्यमातून राग, संताप, चीड व्यक्त करत आहेत. पण या सगळ्यात शहीदांच्या कुटुंबाविषयीची करुणा प्रत्येकाच्या मनात दाटून येत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही जर शहीदांच्या कुटुंबियांना मदत करु इच्छित असाल तर 'भारत के वीर' (Bharat Ke Veer) हे अॅप इनस्टॉल करा. या अॅपच्या माध्यमातून देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांसाठी तुम्ही आर्थिक मदत करु शकता. इतकंच नाही तर bharatkeveer.gov.in या वेबसाईटवरुनही तुम्ही मदत करु शकता. (पुलवामा येथील भ्याड हल्ल्याप्रकरणी रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह अनेक खेळाडूंनी ट्विट करत व्यक्त केल्या भावना)

'भारत के वीर' हा केंद्रीय गृह मंत्रालयाने सुरु केलेला उपक्रम असून एप्रिल 2017 मध्ये हे पोर्टल सुरु करण्यात आले होते. यात सीएपीएफच्या शहीद जवानांची माहिती देण्यात आलेली असते. हे पोर्टल लॉन्च झाल्यानंतर 2 फेब्रुवारीपर्यंत यात 205 शहीद जवानांचा समावेश होता. आतापर्यंत या अॅपच्या माध्यमातून शहीदांच्या कुटुंबियांना 45.32 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईत हायअलर्ट जाहीर

गुरुवारी (14 फेब्रुवारी, 2019) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानकडून 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढून घेण्यात आला आहे.

या शहीद जवानांना मदत करण्यासाठी: 

अॅपच्या माध्यमातून

प्ले स्टोर वरुन 'भारत के वीर' हे अॅप इन्स्टॉल करा. अॅप ओपन केल्यानंतर देशासाठी शहीद झालेल्या जवानांची पूर्ण यादी दिसेल. ज्या जवानाला मदत करायची आहे त्याच्या फोटोवर क्लिक करुन तुम्ही त्याच्या कुटुंबियांना मदत करु शकता.

वेबसाईटच्या माध्यमातून अशी करा मदत

https://bharatkeveer.gov.in/ या वेबसाईटवर जा. येथे तुम्हाला Contribute To हा ऑप्शन दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला शहीद जवानांचा फोटो आणि माहिती मिळेल. त्याचबरोबर 'I Would Like To Contribute' या बटणावर क्लिक करुन तुम्ही शहीदांच्या कुटुंबियांना मदत करु शकता.