Bogibeel Bridge: देशातील सर्वात लांब पूलाचे PM Modi च्या हस्ते 25 डिसेंबरला उद्घाटन
देशातील सर्वात मोठा पूल बोगिबील (Photo Credit: PTI)

देशातील सर्वात लांब अशा बोगिबील पूलाचे (Bogibeel Bridge) 25 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. या पूलाची लांबी 4.94 किलोमीटर असून हा पूल आसाम व अरुणाचल प्रदेशाच्या पूर्वेकडील भागात आहे. हा पूल ब्रह्मपुत्रा नदीच्या (Brahmaputra River) उत्तर व दक्षिण किनाऱ्यांना जोडतो.

25 डिसेंबर हा 'सुशासन दिन' (Good Governance Day) म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी पंतप्रधान मोदी या पूलाचे उद्घाटन करतील. या पूलाचे भूमिपूजन माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी जानेवारी 1997 मध्ये केले होते. त्यानंतर एप्रिल 2002 मध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते पूलाच्या बांधकामाचे उद्घाटन करण्यात आले होते. गेल्या 16 वर्षात या पूलाच्या बांधकामची मुदत अनेकदा चुकली. त्यानंतर अखेर 3 डिसेंबरला या पूलावरुन पहिली मालगाडी धावली.

अरुणाचल प्रदेशातील सीमेजवळ असलेल्या रसद सुधारण्यासाठी भारताने नियोजित पायाभूत प्रकल्पाचा बोगिबेल हा एक भाग आहे. यामध्ये ब्रह्मपुत्रच्या उत्तर किनाऱ्यावर एक ट्रान्स-अरुणाचल महामार्ग बांधणे. ब्रह्मपुत्रा नदी आणि दिबांग, लोहित, सुबांसिरी आणि कामेंग यांसारख्या ब्रह्मपुत्रा नदीच्या प्रमुख उपनद्यांवर नवीन रस्ते आणि रेल्वे मार्ग बांधणे याचाही त्यात समावेश आहे.