PM Narendra Modi (Photo Credits-ANI)

कोरोना व्हायरसने सध्या जगभरात थैमान घातले असून याच्या दहशतीमुळे अनेक कार्यक्रम रद्द केले जात आहे. 17 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बांग्लादेश दौऱ्यावर जाणार होते. ढाका येथे शेख मुजीबुर रहमान यांच्या जयंती शताब्दी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी मोदींचा बांग्लादेश दौरा आयोजित करण्यात आला होता. मात्र कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे निर्माण झालेला धोका लक्षात घेता मोदींचा हा बांग्लादेश दौरा रद्द करण्यात आला आहे. रविवारी बांग्लादेशमध्ये कोरोना व्हायरसचे 3 रुग्ण आढळून आले. त्यामुळे  शेख मुजीबुर रहमान यांच्या जयंती शताब्दी निमित्त आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती सेलिब्रेशन कमिटी चे चेयरमॅन कमाल अब्दुल चौधरी यांनी दिली आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे ब्रुसेल्स दौरा रद्द केला होता. (कोरोना व्हायरस दहशतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोद्धा दौरा कार्यक्रमामध्ये बदल; शरयू नदीवर आरती रद्द)

केरळमधील एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याने देशातीलो कोरोना रुग्णांची संख्या आता 39 वर येऊन पोहचली आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाचा एकही संशयित रुग्ण नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. (Coronavirus: वुहान मधील 100 वर्षीय वृद्धाने केली कोरोना व्हायरसवर मात)

कोरोना व्हायरचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरीकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी असा सल्ला सरकारकडून वारंवार देण्यात येत आहे. तसंच कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची शनिवारी बैठक घेतली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणं टाळणं, गर्दीत जाणं टाळायला हवं. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक नेत्यांनी यंदा होळी सेलिब्रेट करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. तसंच कोरोनाचा व्हायरसच्या पार्श्वभूमीवर होळीचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा न करण्याचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.