
Petrol Diesel Price in India: संसदेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारने दावा केला आहे की, भारतातील इंधन दर (Fuel Prices in India) पाठिमागील काही काळांमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरले किंवा स्थिर राहिले आहेत. पाठिमागील काही काळात भारताचे शेजारील देश आणि पाश्चिमात्य देशांच्या इंधन दरात मोठी वाढ झाली आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेल दरातही मोठ्या प्रमाणावर चढ-उतार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने वेळोवेळी केलेल्या उपाययोजनांमुळे भारतातील इंधन दरात कमालीची कपात आणि स्थिरताही पाहयला मिळत असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.
राज्यसभेत विचारल्या गेलेल्या एका अतरांकीत प्रश्नाला केंद्र सरकारने दिलेल्या उत्तराचा दाखला देत, वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नोव्हेंबर 2021 ते नोव्हेंबर 2023 या काळात मोठ्या प्रमाणावर कमी झाल्या आहेत. त्या तुलनेत विचार करता पाश्चात्य देशांमध्ये या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे पाहायला मिळत असल्याचेही केंद्राने म्हटले आहे. केंद्र सरकारने याबाबत एक आकडेवारी बुधवारी जारी केली. ज्यामध्ये म्हटले आहे की, नोव्हेंबर 2021 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत भारतातील पेट्रोलच्या किमती 11.82%, डिझेल किमतीमध्ये 8.94% इतकी कपात झाली. त्याच तुलनेत शेजारील राष्ट्र पाकिस्तानामध्ये या किमती 41.24% नी वाढल्या. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंकेत हिच वाढ 54.32% इतकी पाहायला मिळाली. (हेही वाचा, महाराष्ट्राचा सुपुत्र Dr Kiran Mahale ची ऑस्ट्रेलिया मध्ये मोठी कामगिरी; टाकाऊ अन्नातून इंधननिर्मिती करत इंधन टंचाईवर दिला नवा पर्यावरणपूरक पर्याय!)
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे निर्माण झालेल्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी केंद्र सरकारने नागरिकांना आर्थिक प्रभावापासून वाचवण्यासाठी सक्रिय उपाय लागू केले आहेत. बाजारातील अस्थिरतेच्या दरम्यान स्थिरतेला प्राधान्य देऊन इंधनाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी धोरणात्मक नियोजन आणि उपक्रम हाती घेण्यात आल्याचे सरकारने आपल्या अधिकृत निवेदनात नमूद केले आहे. अधिकृत आकडेवारी दर्शवते की क्रूड आयातीची सरासरी बारतीय किंमत नोव्हेंबरमध्ये प्रति बॅरल $92.41 वरून डिसेंबरमध्ये $86.58 प्रति बॅरलपर्यंत घसरली. पाश्चिमात्य देशांच्या दबावाला न जुमानता भारताने रशियाकडून तेलाची आयात वाढवली आहे. जो आता सौदी अरेबियाला मागे टाकून भारताला तेल निर्यात करणारा सर्वात मोठा देश बनला आहे. याव्यतिरिक्त, अमेरिकेने लॅटिन अमेरिकन देशावरील निर्बंध उठवल्यानंतर भारतीय तेल कंपन्यांनी व्हेनेझुएलामधून तेल मिळवून त्यांच्या स्त्रोतांमध्ये विविधता आणली आहे.
इंधन दर हा देशातील जनतेसाठी मनेहमीच जिव्हाळ्याचा आणि सरकारसाठी चिंतेचा विषय असतो. वाढत्या इंधन दरामुळे देशातील जनता अतिशय मेटाकुटीला आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हे दर कमी करुन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.