Ex-Congress leader PC Chacko (PC - ANI)

ज्येष्ठ नेते पीसी चाको (PC Chacko) यांनी काँग्रेस Congress) पक्षाला नुकतीच सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर पीसी चाको यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश (PC Chacko To Join NCP) केला. चाको यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पीसी चाको हे काँग्रेस पक्षातील अत्यंत ज्येष्ठ आणि गांधी कुटुंबीयांशी एकनिष्ठ असलेले नेते मानले जात असत. याच चाको यांनी काँग्रेसमध्ये गटबाजी असल्याचे सांगत पक्षाला 10 मार्च रोजी सोडचिठ्ठी दिली होता. केरळ विधानसभा निवडणूक 2021 सुरु असताना चाको यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन पक्षाला एक मोठा झटका दिला आहे.

पीसी चाको हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दुजोरा मिळाला आहे. पीसी चाको हे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे राष्ट्रवादीने म्हटल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. केरळ विधानसभा निवडणूक 2021 दरम्यान घडलेली ही मोठी घडामोड मानली जात आहे.

विशेष असे की महाराष्ट्रात शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे महाविकासआघाडी सरकार सत्तेत आहे. त्यामुळे मित्रपक्ष फोडायचा नाही हे धोरण महाराष्ट्रात तरी सर्वसाधारणपणे राबवले जात आहे. पण केंद्रातही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे संयुक्त पुरोगामी आघाडीचे घटक आहेत. असे असतानाही मित्रपक्षातील नेत्याला राष्ट्रवादीत प्रवेश मिळणार आहे. तांत्रिक बाब अशी की पीसी चाको यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतरच त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे मित्रपक्षाचा नेता फोडला हा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसवर कागदोपत्री तरी चिकटणार नाही. (हेही वाचा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेसचे माजी नेते पी.सी. चाको आज दिल्लीत संयुक्त पत्रकार परिषद घेणार)

पीसी चाको यांनी म्हटले की शरद पवार हे भलेही आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असतील. परंतू, ते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राहिले आहेत. सध्या काँग्रेस ही प्रचंड संकटात आहे. त्यात आता माझा आणि त्या पक्षाचा काहीही संबंध राहिला नाही. काँग्रेस पक्षात आता लोकशाही राहीली नाही. दरम्यान, पीसी चाको हे आजच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आजाद आणि आनंद शर्मा यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.