पीएम नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या 2772 भेटवस्तूंचा होणार लिलाव; 200 रुपयांपासून खरेदी करू शकाल गोष्टी
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Photo Credits: Getty Images)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या 6 महिन्यांत देशभरातून मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव होणार आहे. लिलावाद्वारे जमा झालेला पैसा गंगा स्वच्छतेसाठी वापरला जाईल. अशा प्रकारच्या एकूण 2772 वस्तू सध्या लिलावासाठी ठेवण्यात आल्या आहेत. या वस्तूंची आधारभूत किंमत 200 ते अडीच लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या वस्तूंचा लिलाव 14 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान ई-लिलावाद्वारे केला जाईल. नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी आपल्या भेटींचा लिलाव हा सार्वजनिक ठेवला आहे.

सध्या फक्त देशात मिळालेल्या वस्तूच लिलावात ठेवण्यात आल्या आहेत. लिलाव करावयाच्या वस्तू इंडिया गेट स्थित, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय ठेवल्या गेल्या आहेत. 14 सप्टेंबरपासून नागरिकांना त्या पाहण्यासाठी खुल्या होतील. लिलावातील पैसे नमामि गंगे प्रकल्पात दान केले जातील. याआधीही पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव यावर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये झाला होता. त्यावेळी सर्वाधिक बोली पाच लाख रुपये लागली होती. बीएमडब्ल्यू कारच्या एका लाकडी प्रतिमेसाठी ही बोली लावण्यात आली होती. (हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा होणार लिलाव)

आज केंद्रीय पर्यटनमंत्री प्रह्लाद पटेल यांच्या हस्ते याचे औपचारिक उद्घाटन झाले. मागच्यावेळी लिलावात मांडण्यात आलेल्या वस्तूंमध्ये जगभरातील मान्यवरांनी मोदींना दिलेली पेंटिंग्ज, शिल्पे, पगडी,  शॉल, जॅकेट्स आणि पारंपारिक संगीत वाद्य यांचा समावेश होता. यावेळी कोणत्या गोष्टींचा समावेश असणार आहे याबद्दल उत्सुकता आहे.