पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा होणार लिलाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Photo Credits: Getty Images)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या कार्यकाळात त्यांना मिळालेल्या भेटवस्तू, स्मृतिचिन्ह (Mementos) यांचा लिलाव होणार आहे. संस्कृती मंत्रालयाकडून राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात मोदींना मिळालेल्या वस्तूंचा लिलाव होणार आहे. या लिलावात तब्बल 1900 वस्तूंचा समावेश आहे. या लिलावास 27 आणि 28 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरुवात होईल. या लिलावातून मिळणारी रक्कम 'नामामी गंगे' (Namami Gange) प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे.

या वस्तूंमध्ये जगभरातील मान्यवरांनी मोदींना दिलेली पेंटिंग्ज, शिल्पे, पगडी,  शॉल, जॅकेट्स आणि पारंपारिक संगीत वाद्य यांचा समावेश आहे. या लिलावात मांडण्यात आलेल्या वस्तूंची किंमत ही 100 रुपयांपासून सुरु होणार आहे. सर्वात जास्त किंमत ही 30,00 हजार ठेवण्यात आली आहे. 2.22 किलो वजनाची चांदीच्या प्लेटची किंमत ही 30,000 हजार आहे. ही प्लेट सी.नरसिंह यांनी 6 मे 2016 ला भेट दिली होती. तर 800 ग्रॅम वजनाची हनुमानाची मूर्तीची किंमत 100 रुपये आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या विदेश यात्रेदरम्यान 12.57 लाख रूपयांच्या भेटवस्तू मिळाल्या आहेत. या भेटवस्तूंमध्ये फाउंटन पेन, टी सेट, चिनी मातीची भांडी, लक्ष्मी आणि गणपतीची प्रतिमा, फोटो, पुस्तके, घड्याळ अशा विविध वस्तूंचा समावेश आहे. या वस्तूही या लिलावात असणार आहेत. या लिलावातून उरलेल्या गोष्टींचा लिलाव ऑनलाईन होणार आहे. हा लिलाव 29 आणि 30 जानेवारी रोजी आयोजित केला जाणार आहे. www.pmmementos.gov.in या संकेतस्थळावर हा लिलाव होईल.