
India Pakistan Tension: भारताने 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक व नियोजित हवाई कारवाई करत पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याला ठोस प्रत्युत्तर दिले आहे. या हल्ल्यात 22 एप्रिल रोजी 26 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला होता, ज्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. सिंदूर मोहिमेचा भाग म्हणून प्रत्युतरादाखल भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईनंतर, गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री (Vikram Misri) यांनी पाकिस्तानकडून खोटा प्रचार केला जात असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानचा उद्देश आपल्या दहशतवादातील सहभागापासून लक्ष विचलित करण्याचा आहे. पाकिस्तान अनेक जागतिक दहशतवादी संघटनांशी संबंधित असून त्याचे ठोस पुरावे आहेत, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
'पाकिस्तानच्या नागरिक वा लष्करी स्थळांवर कारवाई नाही'
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्या पत्रकार परिषदेत भारतीय संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी – कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग – उपस्थित होते. त्यांनी भारताच्या कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली. परराष्ट्र सचिवांनी स्पष्ट केले की भारताची कारवाई फक्त दहशतवादी तळांवर केंद्रित होती. ही कारवाई अचूक, मोजकी आणि उत्तेजन न देणारी (Non-Escalatory) होती. पाकिस्तानच्या नागरिक वा लष्करी स्थळांना कोणताही धोका पोहोचवण्यात आलेला नाही.
भारताने फेटाळली पाकिस्तानची मागणी
पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ला केला, ज्यात 16 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. यानंतर भारताने तत्काळ प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानच्या महत्त्वाच्या हवाई संरक्षण प्रणालींना निष्क्रिय केले. या घटनेनंतर पाकिस्तानने पहलगाम हल्ल्यावर संयुक्त तपास करण्याची विनंती केली होती, मात्र भारताने ती स्पष्टपणे फेटाळली. भारताने ही विनंती केवळ एक अडथळा आणि दहशतवाद्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले. (हेही वाचा, Gaganyaan Mission: पाकिस्तानसोबत तणाव वाढला; आयएएफने गगनयान अंतराळवीर अजित कृष्णन यांना परत बोलावले)
विक्रम मिस्री यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवत म्हटले की, पाकिस्तानने गेल्या अनेक दशकांपासून भारताविरुद्ध सीमापार दहशतवाद चालवला आहे. मात्र, भारत अशा कोणत्याही प्रयत्नांना यशस्वी होऊ देणार नाही. भारताची ही भूमिका आंतरराष्ट्रीय स्तरावरही ठाम आणि स्पष्ट असून दहशतवादाविरोधातील लढाईत भारत कोणतीही तडजोड करणार नसल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.