Local Vendor Success Stories: शारीरिक तंदुरुस्त राहण्यासाठी किंवा वाढलेली चरबी जाळण्यासाठी अनेक लोक जीममध्ये ट्रेडमिलवर धावतात किंवा सकाळ संध्याकाळ फिरायला जातात. तरीदेखील हे लोक आहे तसेच राहतात. पण, ओडिशा (Odisha News) राज्यातील एक माणूस असा आहे, जो आपल्या कुटुंबासाठी दररोज चक्क 30 ते 40 किमी चालतो. होय, आणि धक्कादायक असे की, त्याचा हा दिनक्रम पाठिागील चक्क 50 वर्षांपासून आजतागायत कायम आहे. त्याचा पापड विक्री व्यवसाय आहे. ज्यामुळे त्याला परिसरातील लोक 'पापड मॅन' (Papad Man Odisha) म्हणूनच ओळखतात. चक्रधर राणा नावाच्या या व्यक्तिमत्त्वाचा पाच दशकांहून अधिक काळ सुरु असलेला दिनक्रम अनेकांना उर्जा देतो आहे. त्याने मोठ्या कष्टाने पापड विकून आपल्या समाजात प्रेम आणि आदर मिळवला आहे. वाचा या खास माणसाचा हा वैशिष्ट्यपूर्ण संघर्ष.
मेहनतीचा वारसा
नाव: चक्रधर राणा. सध्याचे वय: फक्त 74 वर्षे. व्यवसाय: स्थानिक बाजारपेठेत पापड विक्री. आता तुम्हाला या व्यक्तिमत्वाची जुजबी महिती तर मिळाली. पण, खरी माहिती आणि संघर्ष तर पुढेच आहे. तो म्हणजे, चक्रधर अजूनही स्थानिक बाजारपेठेत पापड विकण्यासाठी भल्या सकाळी घरातून बाहेर पडतो. झपझप पावले टाकत तो आपला दिवस लवकर सुरू करतो. दिवसभर तो इतके चालतो की, 30 ते 40 किलोमीटर पार करुनच त्याची सायंकाळ होते आणि दिवस संपतो. तो आपला पापड विक्रीचा संपूर्ण व्यवसाय पायीच करतो. विशेष म्हणजे त्याच्या पाकडाची किंमत केवळ 10 रुपये आहे. जी त्याच्या चिकाटीचे प्रतिक आहे. चक्रधर यांचा प्रवास 50 वर्षांपूर्वी सुरू झाला जेव्हा त्यांनी पापड फक्त 5 पैशांना विकले. कालांतराने, महागाई आणि बदलत्या बाजारपेठेमुळे किंमती हळूहळू वाढल्या आहेत. (हेही वाचा, Scorching Heat in Rajasthan: बिकानेरमध्ये पारा 47 अंशांवर; BSF जवानाने चक्क गरम वाळूवर भाजला पापड, व्हिडिओ व्हायरल (Watch))
पापड केवळ 5 पैसे प्रति
आपल्या संघर्षा आणि सुरुवातीच्या काळाबद्दल बोलताना चक्रधर राणा सांगतात, 'मी 50 ते 60 वर्षांपासून पापड विकतो आहे. सुरुवातीला माझ्या पापडाची किंमत 5 पैसे होती. आता मी ते 10 रुपयांना विकतो. मी कोलकात्यातून पापड आणतो आणि दररोज सुमारे 1,000 पापड विकतो'. आपल्याला परिसरातील लोक पापड मॅन किंवा पापडवाला म्हणूनही ओळखतात असे, चक्रधर अभिमानाने सांगतात.
अनेकांच्या बालपण आणि तरुणपणाचे साक्षीदार
चक्रधरच्या प्रयत्नांमुळे तो मयूरभंजमधील एक प्रिय व्यक्ती बनला आहे. त्याचे ग्राहक आणि समुदायाचे सदस्य केवळ त्याच्या स्वादिष्ट पापडांचेच नव्हे तर त्याच्या समर्पणाचेही कौतुक करतात. परिसरातील लोक सांगतात, आम्हाला आमच्या लहानपणापासूनच ते पापडवाला म्हणूनच माहित आहेत. आमच्या बालपणीही ते यायचे आणि आम्ही तरुण झालो तरी आजही ते येतात. चक्रधर म्हणजे उदालामधील एक परिचित चेहरा आहे, जो या भागातील बाजारपेठांना भेट देतो. लोक त्याच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. त्याचा पांढरा शर्ट, अर्धी पँट आणि पापडांनी भरलेली टोपली ही प्रतिष्ठित आहेत', असे स्थानिक रहिवासी सांगतात.
समाजात आदराचे स्थान
पापडवाला चक्रधर हे नाव संपूर्ण परिसरास परिचीत आहे. स्वत: चक्रधर आणि स्थानिकही सांगतात की, 'ते आपले पापड 70 ते 80 बाजारपेठांमध्ये विकतात आणि डुकुरापर्यंत 40 किलोमीटरसह लांबचा प्रवास करतात. त्यांच्या चांगल्या स्वभावाने आणि समर्पणाने त्यांना आपल्या समाजात एक आदरणीय आणि प्रिय व्यक्तिमत्व बनवले आहे.
प्रेरणादायी प्रवास
आव्हाने असूनही चक्रधरला त्यांच्या कामाचा प्रचंड अभिमान आहे. 'पापड विकण्याची मला कधीही लाज वाटली नाही. माझ्या कुटुंबाला आधार देण्याचा हा माझा मार्ग आहे', असे ते आवर्जून सांगतात. चक्रधरची कथा ही चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या सामर्थ्याचा पुरावा आहे, जी इतरांना त्यांच्या प्रयत्नांचा अभिमान बाळगण्याची प्रेरणा देते. उदलाच्या लोकांसाठी, तो केवळ एक विक्रेता नाही तर समर्पण आणि कष्टाचे प्रतिक आहे.