
मुंबईतील बदलत्या वातावरणामुळे लवकरच पावसाचे आगमन होण्याची चिन्हे मुंबईकरांना दिसू लागली आहेत. आणि एकदा का पाऊस सुरु झाला की, जोरदार पावसामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. अशा वेळेस प्रशासन कमी पडू नये आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी यंदा प्रशासनाने एक नवीन उपक्रम सुरु केला आहे. यात प्रत्यक्ष रस्त्यावर तैनात असलेले मुंबई वाहतूक पोलीस (Mumbai Traffic Police) दर दोन तासांनी पावसाची स्थिती सर्वांपर्यंत पोहोचवणार आहे.
मुंबईत झालेली 26 जुलै ची परिस्थिती पुन्हा उद्बवू नये यासाठी खबरदारी म्हणून पालिका, रेल्वेप्रमाणे वाहतूक पोलिसांनीही सुमारे दीडशे पानांचा मान्सून कृती आराखडा तयार केला आहे. तसेच यंदा मुंबईत ब-याच ठिकाणी मेट्रो चे काम युद्धपातळीवर सुरु असून, अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे देखील सुरु आहेत. त्यामुळे यावर्षी पावसाळ्यात अनेक ठिकाणी वाहतूककोंडी पाहायला मिळू शकते. त्यासाठी मुंबईतील सर्व वाहतूक पोलिसांनी आणि अधिका-यांनी हा आराखडा अभ्यासावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
या आराखड्यात वाहतूक कोंडीची ठिकाणे, पाणी साचण्याचे भाग यांसारखी महत्त्वाची अशी माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे अतिवृष्टी प्रसंगी काय उपाययोजना सकरावी यासंबंधीची माहिती यात नमूद करण्यात आली आहे. तसेच मुसळधार पाऊस पडत असेल तर शाळा, कॉलेज, ऑफिसेस ला जाणा-यांनी घराबाहेर पडावे नाही याची माहितीही वाहतूक पोलीस देतील. तसेच रात्री दहा वाजल्यापासून सकाळी सहापर्यंत कामावरील अधिकारी आणि कर्मचारी दर दोन तासांनी आपल्या हद्दीतील पाण्याची स्थिती, वाहतूक कोंडी तसेच अपघात किंवा दुर्घटनेची माहिती वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कळवतील.
सकाळी सहा वाजता ही माहिती पालिका, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात दिली जाईल. नागरिक, वाहनचालक, प्रवासी यांना याबाबतची आगाऊ सूचना मिळावी यासाठी नियंत्रण कक्षातून ही माहिती आकाशवाणी, एफएम, वृत्तवाहिन्यांना कळविण्यात येईल. पोलिसांच्या वेबसाइट, सोशल मीडियावरही माहिती अपलोड करण्यात येईल.
तसेच पावसामुळे ज्या ज्या मार्गावर वाहतूक कोंडी असेल, त्याला पर्यायी मार्ग सांगण्याचे कामही वाहतूक पोलीस करणार आहे.