डिलिव्हरी बॉयच्या धर्मावरुन Zomato ची ऑर्डर कॅन्सल करणाऱ्या अमित शुल्क याला पोलिसांकडून नोटीस
Zomato Logo (Photo Credits: Facebook)

ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो वरुन नॉन हिंदू डिलिव्हरी बॉय जेवण घेऊन आल्याने ऑर्डर कॅन्सल करणाऱ्या अमित शुक्ल या ग्राहकाला पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. मध्यप्रदेशातील जबलपूर येथील एसपी अमित सिंह यांनी सांगितले की, "आम्ही एक नोटीस जारी केली असून ती अमित शुल्क यांना पाठवण्यात येईल. त्यांचे अशा प्रकारचे वागणे हे संविधानाविरुद्ध आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे या नोटीसमध्ये म्हणण्यात आले आहे. पोलिस अमित शुल्क याच्यावर पाळत ठेवून आहेत. तसंच त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा धार्मिक वाद पसरवला गेल्यास अमित शुल्क विरुद्ध कारवाई करण्यात येईल. "

जबलपूर येथे राहणाऱ्या अमित शुल्क यांनी झोमॅटोवरुन काही पदार्थांची ऑर्डर दिली होती. पण फूड डिलिव्हरी बॉय मुस्लिम असल्याचे समजताच त्यांनी ऑर्डर कॅन्सल करत डिलिव्हरी बॉयला परत पाठवले आणि दुसऱ्या डिलिव्हरी बॉयला पाठवण्यास सांगितले. त्यानंतर मंगळवारी रात्री ट्विट करत घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यात त्यांनी लिहिले की, "आताच मी झोमॅटो वरील एक ऑर्डर रद्द केली आहे. त्यांनी माझी फूड ऑर्डर नॉन-हिंदू डिलिव्हरी बॉयकडून पाठवली. तसंच ऑर्डर रद्द केल्यावर त्यांनी सांगितले की, ही ऑर्डर रद्द होणार नाही तसंच पैसेही परत केले जाणार नाहीत. त्यावर शुल्क यांनी सांगितले की, मला पैसे परत नको, फक्त ऑर्डर रद्द करा. तुम्ही मला ऑर्डर घेण्याची सक्ती करु शकत नाही." (दिल्ली: Zomato ने नॉन हिंदू डिलेव्हरी बॉय पाठवल्याने ग्राहकाने रद्द केली ऑर्डर; 'झोमॅटो' च्या प्रत्युत्तराने जिंकलं नेटकर्‍यांचं मन)

ANI ट्विट:

या ट्विटसोबत त्यांनी झोमॅटो कस्टमर केअर सोबत झालेल्या संवादाचा स्क्रिनशॉटही जोडला आणि मी याबद्दल माझ्या वकीलांशी बोलेन, असेही सांगितले.

अमित शुल्क यांच्या या ट्विटला उत्तर देताना झोमॅटोने लिहिले की, "अन्नाला कोणताही धर्म नसतो. अन्न हाच एक धर्म आहे." कंपनी आपल्या मतावर ठाम असून कंपनीने डिलिव्हरी बॉय बदलण्यास नकार दिला. तसंच अमित यांना कंपनीकडून देण्यात आलेल्या उत्तराचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.