राज ठाकरे, मनसे अध्यक्ष (file photo)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र, भूमिपूत्र, परप्रांतिय आणि बहुसंख्येने महाराष्ट्रात येणारे उत्तर भारतीय यांच्याबाबतची भूमिका सर्वश्रूत आहे. मात्र, ही भूमिका राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावरुन कशी व्यक्त करतात याबाबत उत्सुकता आहे. कारण, राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय महापंचायतीचे निमंत्रण स्वीकारले आहे. उत्तर भारतीय महापंचायतीच्या कार्यक्रमास राज ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती मनेसेच नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरुन दिलेल्या माहितीनसार, उत्तर भारतीय महापंचायतीचा कार्यक्रम येत्या २ डिसेंबर रोजी कांदिवलीतील बुराभाई हॉल येथे पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी राज ठाकरे यांची उपस्थिती हा सर्वांच्या उत्सुकतेचा आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार आहे. या कार्यक्रमात राज ठाकरे उत्तर भारतीयांसाठी संवाद साधतील.

उत्तर भारतीय महापंचायतीने राज ठाकरे यांना १२ ऑक्टोबर रोजी कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. त्यावेळी आमंत्रण स्वीकारण्याबाबत राज ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रीया किंवा अश्वासन दिले नव्हते. मात्र, संदीप देशपांडे यांनी केलेल्या ट्विटनुसार राज यांनी हे निमंत्रण स्वीकारल्याचे जाहीर केले आहे. (हेही वाचा, भाऊबीज: पंतप्रधान मोदींवर भारतमाता रुसली म्हणाली '...आता यापुढे नाही ओवाळणार!')

दरम्यान, केवळ महाराष्ट्र केंद्री ही मनसेची बनलेली प्रतिमा बदलण्यासाठी पक्षीय स्थरावर जोरदा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी जैन, गुजराती समाजाशी संवाद साधला होता. या पार्श्वभूमिवर राज हे उत्तर भारतीयांच्याही कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याचे समजते.