महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकेकाळचे चाहते. पंतप्रधान मोदींचे नेतृत्व आणि त्यांची निर्णयक्षमता याचे जाहीर भाषणांतूनही राज यांनी अनेकदा कौतुक केले आहे. पण, पंतप्रधान पदावर विराजमान होताच मोदींची धोरणे पाहून राज यांच्या मोदी प्रेमाने जो 'यु टर्न' घेतला तो आजवर कायम आहे. गेल्या काही महिन्यांपासून सभा, भाषणे, पत्रकार परिषदा आणि राज यांच्या व्यक्तिमत्वाचे खास वैशिष्ट्य असलेल्या व्यंगचित्रातून पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर टीकेची एकही संधी राज सोडत नाहीत. सध्या तर दिवाळीचा बहर. त्यामुळे ऐन दिवाळीत राज ठाकरे आपल्या व्यंगचित्रांची मालिकाच घेऊन आले आहे. या व्यंगचित्र मालिकेच्या माध्यमातून राज यांनी पुन्हा एकदा मोदींवर कुंचल्यांची फटकेबाजी केली आहे. व्यंगचित्र मालिकेतील हे सहावे चित्र असून, या आधी भाजप अध्यक्ष अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांनाही राज यांच्या कुंचल्याचे फटके व्यंगचित्रातून बसले आहेत.
राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरुन शेअर केलेल्या व्यंगचित्रात पंतप्रधान मोदींवर टीका आहे. भाऊबीज आणि भारतमाता या संकल्पनेवर आधारलेलेल हे व्यंगचित्र पंतप्रधान मोदींच्या 'अच्छे दिन' आणि त्यांनी भाषणात दिलेल्या अवास्तव अश्वासनांची पोलखोल करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणबाजीवर भाळून लोकांनी 2014मध्ये भाजपला सत्ता दिली. पण, आता 2019मध्ये असे होणार नाही. भारत माता पुन्हा ओवळणारच नाही, असे भाष्य राज ठाकरे आपल्या भाषणातून करु पाहात आहेत. (हेही वाचा, लक्ष्मीपूजन : मोदी, फडणवीस, गडकरींवर राज ठाकरेंचे व्यंगचित्रातून टिकास्त्र)
भारतमातेचा रुसवा आणि भांबावलेले पंतप्रधान मोदी..
आपल्या व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भारतमाता यांचे बहीण-भावाचे नाते दाखवले आहे. पंतप्रधान मोदी मोठ्या आनंदाने पाटावर बसले आहेत. आता भारत माता आपल्याला ओवाळणार असे त्यांना वाटते. पण, वास्तवात तसेच घडतच नाही. भारतमाता पंतप्रधान मोदींना साफ सांगते की, 'गेल्या वेळेस ओवाळले पण, आता यापुढे नाही ओवाळणार'. व्यंगचित्राच्या वरच्या बाजूला डाव्या आणि उजव्या कोपऱ्यात 2014 आणि 2019 अशा वर्षांचा उल्लेख केला आहे. जो या वर्षांत झालेल्या आणि होणाऱ्या निवडणुकांवर अप्रत्यक्ष भाष्य करतो. तर, देशातील विविध प्रश्न, बेकारी, महागाई, राफेल, महिला अत्याचार यांसारख्या असंख्य मुद्द्यांच्या पाट्याही चित्रात दिसत आहेत.
#Diwali2018 #RTist #RajThackeray #cartoons #दिवाळी #Bhaubeej #India #Promises #Lies #Reality #BJP pic.twitter.com/nEiFzR5o1t
— Raj Thackeray (@RajThackeray) November 9, 2018
एकूणच काय तर सरकारवर टीका करणारे सर्व मुद्दे चित्रात दिसतात. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतमातेकडून अचानक आलेल्या अशा या अनपेक्षीत प्रतिसादामुळे मोदी चांगलेच अवाक झाले आहेत. भारतमातेचा रुसवा पाहून मोदींच्या चेहऱ्यावर आश्चर्य, वेंधळेपणा, गोंधळ आणि काहीसी नाराजी असे सर्वच भांभावलेपणाचे सर्व भाव राज यांनी मोठ्या रंजकपणे रेखाटले आहेत.