केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) हे केवळ नावालाच डॉक्टर नाहीत, तर वेळप्रसंगी रोग्याच्या मदतीला ते तत्परतेने धावू शकतात ही गोष्ट त्यांनी पुन्हा सिद्ध केली आहे. भागवत कराड यांनी मंगळवारी विमान प्रवासादरम्यान आजारी पडलेल्या प्रवाशाला मदत केली. मंत्रीपदावर अजूनही ते आपले वैद्यकीय व्यवसायातील कर्तव्य विसरलेले नाहीत, कदाचित त्यामुळेच मराठवाड्याच्या या सुपुत्राचा आज महाराष्ट्रासह देशाला अभिमान आहे. ही घटना सोमवार, 15 नोव्हेंबर रोजी घडली.
इंडिगोच्या दिल्ली-मुंबई फ्लाइटमधून डॉ. भागवत कराड मुंबईला येण्यासाठी प्रवास करीत होते. त्याचवेळी मागच्या सीटवर बसलेल्या एका प्रवाशाला अचानक त्रास होऊ लागला आणि तो सीटवरून खाली पडला. या घटनेनंतर विमानात एकच खळबळ उडाली. डॉ.कराड यांच्या कानावरही लोकांचा आवाज पोहोचला. त्यानंतर विमानातील क्रूने डॉक्टरांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. रुग्णाची अडचण लक्षात येताच कराड धावत त्याच्याजवळ पोहोचले.
डॉ.भागवत कराड यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्या व्यक्तीला मदत केली. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री असल्याचा प्रोटोकॉलही मोडला. डॉक्टर असल्याने त्या रुग्णाचा जीव वाचवणे हे त्यांनी आपले आद्य कर्तव्य समजले. विमानात उपस्थित सर्व प्रवाशीही हे संपूर्ण दृश्य पाहत होते. मंत्री कराड यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, रक्तदाबाच्या समस्येमुळे प्रवाशाला चक्कर आली, त्यानंतर कराड यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले.
या रुग्ण प्रवाशाचे वय सुमारे 40 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. उपचारानंतर त्याला बरे वाटू लागले. सुमारे 45 मिनिटांनी विमान मुंबईत उतरले तेव्हा त्या व्यक्तीला उपचारासाठी नेण्यात आले. विमान प्रवासादरम्यान, रुग्णाच्या मदतीसाठी पुढे आल्याबद्दल आणि सतर्कता दाखवल्याबद्दल सर्वजण सोशल मीडियावर केंद्रीय मंत्र्यांचे कौतुक करत आहेत. हा संपूर्ण अनुभव डॉ.भागवत कराड यांनी फेसबुक पोस्टद्वारे शेअर केला आहे. असे अनेक अनुभव आपल्याला आले आहेत व गरजू व्यक्तीला मदत केल्याने खूप आनंद आणि दिलासा मिळतो, असे त्यांनी म्हटले आहे.