McDonald Cheese: बर्गर आणि नगेट्समध्ये डाल्डा सापडल्यानंतर मॅकडोनाल्डने घेतला हा मोठा निर्णय

‘मॅकडोनाल्ड’ (McDonald) च्या साखळी रेस्टॉरंट्सवर राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून (FDA) मोठी कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई करण्यामागचे कारण म्हणजे, मॅकडोनाल्ड्सच्या रेस्टॉरंट्समध्ये बनवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये चीजचा वापर न करता, चीजसदृश्य पदार्थांचा वापर केलेला आढळून आला. ही बाब उघडकीस आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.  हा सर्व प्रकार घडला तो अहमदनगर जिल्ह्यातील केडगावमध्ये. केडगाव येथील ‘मॅकडोनाल्ड’ च्या रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या विविध पदार्थांमध्ये चीजच्या ऐवजी चीजसदृश्य पदार्थ वापरला जात होता. (हेही वाचा - Tomato Price: दिल्लीत टोमॅटोची किंमत 200 रुपये प्रति किलो, पुन्हा नागरिकांच्या खिश्याला कात्री)

या रेस्टॉरंटने या नोटीसकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि चीजसदृश्य पदार्थांचा वापर तसाच चालू ठेवला होता. त्यामुळे, अन्न आणि औषध प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मॅक्डोनाल्डच्या या आऊटलेटवर गंभीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मॅकडोनाल्ड्स या रेस्टॉरंट्सची साखळी चालवणाऱ्या हार्डकॅसल रेस्टॉरंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने नरमाईची भूमिका घेत, आपण या पदार्थांची नावे बदलल्याचे पत्र या अधिकाऱ्यांना दिले आहे.

मॅकडोनाल्ड्सच्या पदार्थांमध्ये कंपनीने आता त्यांच्या खाद्यपदार्थांमधून 'चीज' हा शब्द हटवला आहे. हा आदेश अहमदनगर या जिल्ह्यापुरताच मर्यादित असला तरी हा आदेश महाराष्ट्रातील मॅकडोनॉल्ड्सच्या सर्वच रेस्टॉरंटला लागू असणार आहे, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी दिली आहे.

दरम्यान मॅकडोनाल्डने याप्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. “महाराष्ट्रातील मॅकडोनाल्‍ड्स स्टोअर्समधील आमच्या मेन्‍यूमधून 'चीजहा शब्द काढून टाकल्याच्या अलीकडील अहवालांबाबत आम्ही आमच्या ग्राहकांना खात्री देऊ इच्छितो की आम्ही आमच्या सर्व उत्पादनांमध्ये फक्त शुद्ध (रिअल), दर्जेदार चीज वापरतो. आम्ही या विषयावर संबंधित अधिकाऱ्यांसोबत सक्रियपणे काम करत आहोत. आमच्या घटकांमधील पारदर्शकतेप्रती आमची वचनबद्धता आणि आमच्या ग्राहकांना स्वादिष्टउच्च दर्जाचे खाद्यपदार्थ देण्‍याप्रती समर्पितता अतूट आहे.” असे मॅकडोनाल्डकडून सांगण्यात आले आहे.