(Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

राज्यात आभाळ (Maharashtra Weather) भरुन येऊ लागले आहे. परिणामी आजपासून पुढचे काही दिवस राज्यात अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) सावट आहे. बदलत्या हवामानामुळे (Climate Change) होणारे बदल हे सर्वांसाठीच त्रासदायक ठरत आहेत. हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजात म्हटले आहे की, आजपासून (15) पुढचे काही तीन दिवस, म्हणजेच 15 ते 18 मार्चपर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस तुरळक ठिकाणी पडू शकतो. काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस येऊ शकतो. तर काही भागात गारपीटही होऊ शकते. ज्यामुळे पिकांना फटका बसू शकतो. शेतकरी सध्या कांदा, गहू, हरभरा पिकांच्या काढणीत गुंतला आहे. अशा वेळी अवकाळी पाऊस बळीराजासाठी चिंता ठरला आहे.

राज्यात काही ठिकाणी वातावरण ढगाळ असले तरी, उन्हाचा चटकाही अनेक ठिकाणी वाढला आहे. प्रामुख्याने सकाळची कोवळी उन्हे सोडली तर सायंकाळ होईपर्यंत ऊन चांगलेच आपले रुप दाखवत आहे. खास करुन ग्रामीण भागात शेतकाम करणाऱ्या शेतकरी, मजूराला उन्हाच्या झळा अधिक लागत आहेत. अशात पिकांच्या काढणीचा हंगाम आल्यान शेतकऱ्याला उन्हात जाण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे उन्हात काम करताना काळजी घ्यावी असे अवाहन केले जात आहे.

दरम्यान, पुढच्या काही काळात राज्यातील तापमानात घट होण्याची चिन्हे आहे. कमाल तापमान दोन अंश सेल्सियसने घटू शकते. या काळात पाऊस पडल्यास संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी काढणीला आलेली आपली पिके मळणी करुन निवाऱ्याच्या ठिकाणी न्यावीत असे अवाहन कृषी विभागाने केले आहे.

ट्विट

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात तर, मराठवाड्यात उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, जळगांव, आणि नाशिक जिल्ह्यात तर पश्चिम महाराष्ट्राती हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.