LPG Cylinder Price Hike: घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 15 रुपयांनी वाढ; आजपासून लागू होणार नवे दर
LPG Cylinder Price Hike (Photo Credits: ANI)

सर्वसामान्यांच्या खिशाला अधिक झळ पोहचणार आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी (Petroleum Companies) घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या (Domestic LPG Cylinders) किंमतीत 15 रुपयांनी वाढ केली आहे. वाढीव दरानुसार, आता मुंबईमध्ये (Mumbai) विनाअनुदानित गॅस सिलेंडरची किंमत 844.50 रुपयांवरुन 899.50 रुपये इतकी झाली आहे. तर दिल्लीमध्ये (Delhi) विनाअनुदानित 14.2 किलो सिलेंडरची किंमत 899.50 रुपये आहे. तर 5 किलो सिलेंडरची नवीन किंमत 502 रुपये इतकी आहे. हे नवे दर आजपासून लागू होणार आहेत.

व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस सिलेंडरचा दर काही दिवसांपूर्वीच वाढवण्यात आला होता. या किंमतीत 43.50 रुपयांनी वाढल्या होत्या. त्यामुळे हॉटेल्स, रेस्टारंट, स्टॉल्स, ढाबे मालक यांना मोठा फटका बसणार आहे. परिणामी ही झळ सर्वसामान्यांपर्यंत पोहचणार आहे. (LPG सिंलिंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ, महिन्याच्या सुरुवातीलाच महागाईचा झटका)

ANI Tweet:

पेट्रोल डिझेलच्या किंमतीतही सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता एलपीजी गॅस सिलेंडरचे भाव वधारले आहेत. त्यामुळे आगामी सणासुदीचा काळ पाहता सर्वसामान्यांना या महागाईचा चांगलाच फटका बसणार आहे. दरम्यान, पेट्रोल, डिझेलचे दर आज पुन्हा एकदा वाढले आहेत. आज मुंबईत पेट्रोल 109 रुपयांच्या आसपास तर डिझेल शंभरी गाठण्याच्या मार्गावर आहे. पेट्रोल 108.96 रुपये तर डिझेल 99.17 रुपये किंमतीने विकले जात आहे.