Lokmanya Tilak Death Anniversary 2020: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज, 1 ऑगस्ट रोजी 100 वी पुण्यतिथी आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे आद्य प्रवर्तक, भारतीय असंतोषाचे जनक, गणितज्ञ, खगोलतज्ज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्यसेनानी अशी ओळख असणाऱ्या टिळकांनी आजच्या दिवशी आपला देह ठेवला. याच दिवसाच्या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी टिळकांच्या आयुष्यातील विविध पैलूंविषयी माहिती देत एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या मध्ये मोदींनी स्वतःच्या आवाजात टिळकांच्या आयुष्याची माहिती देत त्यांना नमन केले आहे. या व्हिडीओ मध्ये टिळकांचे अगदी जुने अनेक फोटो आणि व्हिडीओज सुद्धा पाहायला मिळत आहेत.
नरेंद्र मोदी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करणारे टिळक ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यात जहाल भूमिका घेऊन ब्रिटिशांना सुद्धा घाबरावणारे टिळक अशा विविध रूपांचे दर्शन घडून येते. याशिवाय मोदींनी टिळकांच्या अहमदाबाद मधील स्मारकाविषयी सुद्धा भाष्य केलं आहे. जेव्हा १९१६ मध्ये टिळक अहमदाबाद मध्ये गेले होते, तेव्हा ४० हजारहून अधिक नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी सरदार वल्लभ भाई पटेल हे टिळकांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाले होते, टिळकांच्या निधनानंतर पटेल यांनी त्यांचे स्मारक उभारण्याचे ठरवले, यासाठी व्हिकटोरीया गार्डनची निवड करण्यात आली. याला ब्रिटिश अधिकाऱ्यांनी विरोध करूनही त्यांनी आपलं म्हणणं लावून धरलं आणि अखेरीस टिळकांचे स्मारक बनवण्यात आले, विशेष म्हणजे महात्मा गांधी यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन झाले होते.
लोकमान्य टिळक पुण्यतिथी विशेष नरेंद्र मोदी ट्विट
India bows to Lokmanya Tilak on his 100th Punya Tithi.
His intellect, courage, sense of justice and idea of Swaraj continue to inspire.
Here are some facets of Lokmanya Tilak’s life... pic.twitter.com/9RzKkKxkpP
— Narendra Modi (@narendramodi) August 1, 2020
दरम्यान, लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी सिंहगर्जना केली होती. तर आपण सर्वांनी सुराज्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे असे म्हणत त्याच्या निर्मितीसाठी काम करायला हवे असे म्हणत मोदींनी टिळकांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली आहे.