Lok Sabha Elections 2024: प्रियंका गांधी रायबरेलीमधून, तर राहुल गांधी अमेठी येथून लोकसभा निवडणूक लढवणार; सूत्रांची माहिती, पुढील आठवड्यात दाखल करणार  उमेदवारी अर्ज
राहुल गांधी यांच्यासह प्रियांका गांधी वड्रा | (PC - ANI)

Lok Sabha Election 2024: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) रायबरेलीतून (Rae Bareli), तर राहुल गांधी (Rahul Gandhi) अमेठीतून (Amethi) लोकसभा निवडणूक लढवू शकतात. सूत्रांनी गुरुवारी ही माहिती दिली. माहितीनुसार, दोघेही निवडणूक लढवणार की नाही याचा अंतिम निर्णय 26 एप्रिलनंतर घेतला जाईल. त्यानंतर पुढील आठवड्यात उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यासाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात केरळच्या वायनाडमध्ये मतदान होणार असून, या जागेवरून राहुल गांधी निवडणूक लढवत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अमेठी आणि रायबरेली लोकसभा जागांवर 20 मे रोजी मतदान होणार आहे.

स्मृती इराणी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीमधून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पराभव केला होता. या जागेवरून भारतीय जनता पक्षाने इराणी यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वायनाडमध्ये मतदान केल्यानंतर राहुल गांधी 27 एप्रिलला अमेठीला जाऊ शकतात. राहुल गांधी अमेठीतून उमेदवारी दाखल करू शकतात. (हेही वाचा: Election Commission Notice : पंतप्रधान नरेंद्र मोदी-राहूल गांधी यांना निवडणूक आयोगाची नोटीस; 4 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश)

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यातील जागा करारानुसार काँग्रेस 17 जागांवर तर समाजवादी पक्ष उर्वरित 63 जागांवर निवडणूक लढवत आहे. काँग्रेस आपला पारंपारिक बालेकिल्ला रायबरेली आणि अमेठी व्यतिरिक्त वाराणसी, गाझियाबाद आणि कानपूर या महत्वाच्या जागांवरूनही निवडणूक लढवत आहे. रायबरेली हा 1960 च्या दशकापासून काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, ज्याचे प्रतिनिधित्व फिरोज गांधी आणि इंदिरा गांधी या दोघांनी केले आहे. 2006 च्या पोटनिवडणुकीत विजयी झाल्यापासून सोनिया गांधी या मतदारसंघातून खासदार आहेत. सोनिया गांधी वरिष्ठ सभागृहात गेल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना इथून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे अमेठीबाबत एक सर्व्हे केला आहे आणि त्यात काँग्रेसला इनपुट मिळाले आहे की राहुल गांधी ही जागा जिंकू शकतात. त्यामुळे राहुल गांधी स्मृती इराणी यांच्या विरोधात निवडणूक लढवू शकतात. त्यादृष्टीने पक्षाकडून स्थानिक पातळीवरही तयारी जोरात सुरू करण्यात आली आहे. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यातही चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर प्रचार करत असल्याने राहुल गांधींना त्यांच्या जुन्या बालेकिल्ल्यात विजय मिळवणे सोपे जाणार नाही.