
Election Commission Notice : सध्या देशात लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या देशभरात प्रचारसभा सुरु आहेत. प्रचारादरम्यान, निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या काही वक्तव्यांची दखल घेतली आहे. त्यांना नोटीस (Election Commission Notice)पाठवून 29 एप्रिल सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून आचार संहितेचे उल्लंघन झाल्या प्रकरणाची दखल घेतली आहे. दोन्ही नेत्यांनी धर्म, जात, समुदाय, भाषा या आधारावर द्वेष आणि विभाजन निर्माण केल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांकडून उत्तर मागितलं आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पीएम मोदी यांच्यावर तर, बीजेपी अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राहुल गांधी यांच्यावर आचार संहिता उल्लंघनाचा आरोप केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या बांसवाडा येथे एका सभेला संबोधित करताना काँग्रेसच सरकार सत्तेवर आल्यास ते देशाची संपत्ती घुसखोर आणि ज्यांना जास्त मुलं आहेत, त्यांच्यात वाटेल, असे म्हटले होते. पीएम मोदींच्या या वक्तव्यावर काँग्रेस आक्रमक झाली. पंतप्रधान हिंदू-मुस्लिम करतायत असा आरोप काँग्रेसने केला. पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
राहुल गांधीवर काय आरोप?
दरम्यान, राहुल गांधी त्यांच्यासभेत ज्या भाषेचा, शब्दांचा वापर करतात, त्यावरुन भाजपाने राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली होती. राहुल गांधी यांनी तामिळनाडूत भाषेच्या आधारावर लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भाजपाने केला होता. राहुल गांधी आपल्या भाषणात भाषेच्या आधारावर उत्तर आणि दक्षिण भारतात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात असा आरोप भाजपा नेत्यांनी केला होता.