Chirag Paswan | (Photo Credits: Facebook)

लोक जनशक्ती पार्टी (LJP) दोन गटात विभागल्यानंतर खासदार चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी बिहारमध्ये आशीर्वाद यात्रा काढली आहे. आशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने चिराग पासवान हे बेगूसराय येथे पोहोचले. या ठिकाणी त्यांनी बिहारच्या संभाव्य राजकारण आणि राजकीय भविष्यावर भाष्य केले. हे भाष्य करताना चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (Janata Dal (United)) पक्षात लवकरच फूट पडणार आहे. परिणामी आगामी काळात बिहारमध्ये मध्यावधी निवडणुका (Mid-term Elections in Bihar) लागतील, असे भाकीत चिराग पासवान यांनी केले आहे. चिराग पासवान यांनी बेगुसरायमध्ये पत्रकारांशी चर्चा करताना म्हटले की, मुख्यमत्री नितीश कुमार यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात जवळच्या लोकांनाही धोका दिला आहे.

चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका करताना म्हटले की, आपल्याच लोकांचा प्रभाव कमी करण्यासाठी त्यांनी आपल्याच लोकांना धोका देत केवळ आर सी पी सिंह यांना मंत्री बनवले. नितीश कुमार यांनी आतापर्यंत लालू प्रसाद यादव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही धोका दिल्याचे म्हटले. बेगूसराय येथील कार्यकर्त्यांनी चिराग पासवान यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. या वेळी चिराग यांनी म्हटले की, जदयुमधील नाराज आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.

चिराग पासवान यांनी पुनरुच्चार करत म्हटले की, जदयूमध्ये फूट ही निश्चित आहे. त्यामुळे बिहारमध्ये लवकरच मध्यावदी निवडणुका लागणार हेही नक्की आहे. राष्ट्रीय जनता दलासोबत युती करण्याबाबत विचारले असता चिराग पासवान यांनी सांगितले की सध्या तरी निवडणुका नाहीत. त्यामुळे त्याबाबत सांगता येणार नाही. वेळ आल्यावर गोष्टी स्पष्ट करु. चिराग पासवान यांनी आपल्या आशीर्वाद यात्रेचे आयोजन पीता रामविलास पासवान यांची कर्मभूमी राहिलेल्या हाजीपूर येथून सुरु केली.