पासपोर्ट (Image: PTI/Representational)

भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय आपल्या पासपोर्ट सेवा कार्यक्रमासाठी (Passport Seva Programme) लोगो (Logo) आणि टॅगलाइन (Tagline) शोधत आहे. मंत्रालयाच्या पासपोर्ट सेवा विभागाने यासाठी खुली स्पर्धा आयोजित केली आहे. याद्वारे आपण पासपोर्ट सेवा कार्यक्रमासाठी लोगो डिझाइन करू शकता आणि टॅगलाइन सुचवू शकता. जर का तुम्ही स्वतःला सर्जनशील समजत असाल तर आपण पासपोर्ट सेवा कार्यक्रमाच्या या स्पर्धेत भाग घेऊ शकता. यासाठी विजेत्याला रोख बक्षीस देण्यात येणार आहे. सरकारी वेबसाइट http://mygov.in/ नुसार सर्वोत्कृष्ट स्पर्धकाला 25,000 रुपये रोख बक्षीस देण्यात येईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जानेवारी आहे.

सरकारच्या या स्पर्धेत कोणताही भारतीय भाग घेऊ शकतो. परदेशात राहणारे भारतीयही या स्पर्धेस पात्र आहेत. आपण तयार केलेला लोगो www.mygov.in या सरकारी वेबसाइटवर सबमिट करावा लागेल. एक व्यक्ती फक्त एकदाच नोंदणी करू शकतो. mygov Blog या वेबसाइटवर विजेत्याची घोषणा केली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार या स्पर्धेचा निकाल 4 आठवड्यांत जाहीर केला जाईल. (हेही वाचा: 7th Pay Commission: 'या' राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि सेवानिवृत्तीच्या वयात होणार वाढ)

असा असावा लोगो –

  • आपला डिझाइन केलेला लोगो ओरिजिनल असावा.
  • तुमचा लोगो कॉपीराइट कायदा 1957 चे उल्लंघन न करणारा असावा.
  • हा लोगो केवळ डिजिटल प्लॅटफॉर्मवरच डिझाइन केलेला असावा.
  • हा लोगो आक्षेपार्ह किंवा चिथावणीखोर नसावा.
  • टॅगलाइनमध्ये इंग्रजी किंवा हिंदी शब्द वापरले जाऊ शकतात.

यासोबतच काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. जसे की, लोगो एआय (AI), जेपीईजी (JPEG), पीएनजी (PNJ), पीएसडी (PSD) किंवा पीडीएफ (PDF) स्वरूपात असावा. तुमचा लोगो वेबसाइट, मोबाइल अॅप, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियावर डिस्प्ले करण्यास योग्य असावा. हा लोगो हाय रिझोल्यूशनमध्ये असावा. तो कमीत कमी 300 Dpi मध्ये असणे गरजेचे आहे.