
ब्रेकअप झाल्यानंतर आपल्या एक्स-जोडीदाराला त्रास देण्यासाठी लोक कोणत्याही थराला जातात. याची अनेक उदाहरणे समोर अली आहेत. आता प्रेयसीशी ब्रेकअप झाल्यानंतर एका तरुणाने या मुलीला त्रास देण्यासाठी जे कृत्य केले, ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. तर कोलकाता (Kolkata) येथे एका 25 वर्षीय तरुणाने आपल्या माजी प्रेयसीला त्रास देण्यासाठी तब्बल 300 कॅश-ऑन-डिलीवरी (COD) पार्सल तिच्या घरी पाठवले. या प्रकरणी त्याला अटक करण्यात अली आहे. हा तरुण नदिया येथे राहणारा असून, त्याने आपल्या माजी प्रेयसीच्या ऑनलाइन खरेदीच्या आवडीचा गैरफायदा घेत तिला चार महिन्यांपासून पार्सल पाठवून त्रास दिला.
ही मुलगी एका बँकेत कार्यकारी पदावर कार्यरत आहे. त्यांचे नाते तुटल्यानंतर त्याने असा सूड उगवला, आणि या कृत्यामुळे तिचे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील खातेही बंद झाले. या घटनेने कोलकात्यात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपास करून या तरुणाला ताब्यात घेतले आहे. अहवालानुसार, तरुणाचे म्हणणे आहे की, आपण मुलीला महागड्या भेटवस्तू देत नाही, म्हणून तिने नाते तोडले. यामुळेच प्रेमात दुखावलेल्या प्रियकराने आपल्या एक्स प्रेयसीच्या घरी कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर पाठवण्यास सुरुवात केली.
हा त्रास गेल्या वर्षी नोव्हेंबर 2024 पासून सुरू झाला. या मुलीला तिच्या मर्जीविरुद्ध मोबाइल फोन, टॅब्लेट, कपडे आणि व्हॅलेंटाइन डेच्या भेटवस्तूसह अनेक वस्तूंची पार्सल मिळू लागली. या सर्व वस्तू कॅश-ऑन-डिलीवरीच्या स्वरूपात होत्या, म्हणजे तिला डिलिव्हरीच्या वेळी पैसे द्यावे लागत होते. तिने या वस्तू परत करण्याचा प्रयत्न केला, पण वारंवार पार्सल येण्याने तिची मोठी अडचण झाली. फेब्रुवारी 2025 मध्ये तर दररोज अनेक डिलिव्हरी येऊ लागल्या, ज्यामुळे तिचे डिलिव्हरी कर्मचाऱ्यांशी वादही झाले. शेवटी, तिच्या तक्रारीमुळे ई-कॉमर्स कंपन्यांनी तिचे खाते ब्लॉक केले. (हेही वाचा: Cyber Fraud: सायबर फसवणुकीला बळी पडल्यानंतर बेळगावीमध्ये वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या; सुसाईड नोटद्वारे दिली माहिती, तपास सुरु)
यानंतर मुलीने पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना सुरुवातीला तिच्या सहकाऱ्यांवर संशय होता, पण नंतर हे कृत्य तिच्या माजी प्रियकराने केल्याचे उघड झाले. या तरुणाचे नाव सुमन सिकदर असे असून, तो आणि ही महिला अनेक वर्षे एकमेकांना ओळखत होते. त्यांचे नाते काही महिन्यांपूर्वी तुटले होते, आणि त्याला हे सहन झाले नाही. पोलिसांना दिलेल्या जबाबात सुमनने कबूल केले की, मुलगी ऑनलाइन खरेदीची शौकीन होती आणि त्याच्याकडून महागड्या भेटवस्तूंची मागणी करायची. त्याला त्या पूर्ण करणे शक्य नव्हते, आणि ती त्याला याच कारणासाठी सोडून गेली असे त्याला वाटत होते. म्हणूनच त्याने तिला त्रास देण्यासाठी ही अनोखी पद्धत वापरली.