Images of Kerala (Photo Credits: Google Images)

कोरोना विषाणू (Coronavirus) संकटामुळे गेले 7 महिने अनेक पर्यटन स्थळे (Tourist Places) बंद आहेत. या संकटाचा पर्यटन (Tourism) आणि हॉटेल (Hotel) इंडस्ट्रीवर फार विपरीत परिणाम झाला आहे. आता कुठे हळू हळू गोष्टी सुरु होण्यास परवानगी देण्यात आहे. अशात केरळ (Kerala) सरकारने एक महत्वाचा निर्णय घेत राज्यातील बीचेस (Beaches) सुरु करण्यास परवानगी दिली आहे. पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. उद्या, 1 नोव्हेंबर, केरळ दिवसाचे (Kerala Piravi Day) औचित्य साधून राज्यातील समुद्र किनारे पर्यटकांसाठी खुले होतील.

अनलॉक प्रक्रियेचा एक भाग म्हणून, राज्य सरकारने दोन टप्प्यात पर्यटन स्थळे उघडण्याचा निर्णय घेतला होता. पर्यटन विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात, हिल स्टेशन, अ‍ॅडव्हेंचर रिसॉर्ट आणि हाऊसबोट यासह बॅकवॉटर टूरिस्ट सेंटर 12 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आले असून, इथे कोविड-19 च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. यानंतर दुसऱ्या टप्प्यात 1 नोव्हेंबरला केरळ दिनानिमित्त किनारपट्टीवरील पर्यटन केंद्रे पुन्हा सुरू केली जातील. पर्यटकांसाठी बीचेस पुन्हा सुरु करणे आणि 26 नवीन पर्यटन प्रकल्प सुरू झाल्यामुळे या क्षेत्राला पुनरुज्जीवन मिळण्याची अपेक्षा आहे. (हेही वाचा: आसामच्या दुर्मिळ चहाला यंदा लिलावात प्रतिकिलो 75,000 रूपयांचा विक्रमी दर)

कोरोना साथीच्या काळात, समुद्रकिनार्‍यावरील रिसॉर्ट्समध्ये केवळ स्थानिक पर्यटकांनाच भेट देण्याची परवानगी होती. मात्र नेहमीच इथे परदेशी पर्यटकांची गर्दी राहिली आहे. केरळचे प्राचीन समुद्रकिनारे, जसे की, कोवलम, वरकला किंवा बेकाल, हे नेहमीच जागतिक पर्यटकांचे आकर्षक राहिले आहेत. आता पर्यटक अशा बीचेसना भेटी देऊ शकतील. दुसरीकडे कोरोना व्हायरस महामारी दरम्यान केरळच्या सबरीमाला येथे दोन महिन्यांच्या यात्रेसाठी भगवान अयप्पा मंदिराचे दरवाजे 16 नोव्हेंबरला उघडले जातील. यावेळी दररोज सुमारे एक हजार भाविकांना दर्शन घेण्याची परवानगी असेल. मुख्यमंत्री पिनाराय विजयन यांनी गुरुवारी ही माहिती दिली.