Representational Image (Photo Credits: File Image)

गेल्या काही दिवसांपासून केरळमधून (Kerala) रॅगिंगच्या (Ragging) अनेक घटना समोर आल्या आहेत. नुकतेच केरळमधील एका शालेय विद्यार्थ्याने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याचा दावा त्याच्या आईने केला होता. आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आता केरळमधील कोट्टायम येथील सरकारी नर्सिंग कॉलेजमध्ये, तिसऱ्या वर्षातील पाच विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या रॅगिंगप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याबाबत तीन पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

त्यांनी नमूद केले की, गेल्या तीन महिन्यांपासून त्यांना रॅगिंगचा सामना करावा लागत होता. तक्रारीनुसार, रॅगिंग गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू झाले. पोलिसांनी सांगितले की, पीडितांनी कोट्टायम गांधीनगर पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली, ज्यामध्ये तीन महिने सुरू असलेल्या हिंसक घटनांची माहिती देण्यात आली. तक्रारीनुसार, त्यांना नग्न उभे राहण्यास भाग पाडले गेले आणि त्यांच्या गुप्तांगांवर जड डंबेल लटकवले. तसेच, ज्योमेट्री बॉक्समधील कंपास सारख्या वस्तूंनी विद्यार्थ्यांच्या अंगावर जखमा करून त्यावर लोशन लावण्यात आले.

वरिष्ठ विद्यार्थ्यांनी संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला आणि तो इतरांसोबत शेअर केला. यासह पिडीत मुलांनी सांगितले की, सीनियर्सनी त्यांच्याकडून मद्य खरेदीसाठी पैसे उकळले आणि पैसे नाही दिल्यास त्यांना वारंवार मारहाण केली. तसेच धमकी दिली की, जर त्यांनी तक्रार केली तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल आणि त्यांचे शैक्षणिक भविष्यही धोक्यात येईल. जेव्हा एका विद्यार्थ्याला हे अत्याचार सहन झाले नाहीत तेव्हा त्याने त्याच्या वडिलांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर वडिलांच्या सांगण्यावरून मुलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. (हेही वाचा; Kerala Ragging Suicide Case: 'टॉयलेट सीट चाटायला लावली, कमोडमध्ये डोके घातले'; रॅगिंगमुळे मुलाने आत्महत्या केल्याचा आईचा आरोप, तपास सुरु)

पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली व कॉलेज प्रशासनाने सर्व आरोपींना निलंबित केले. आरोपी विद्यार्थ्यांनी इतर अनेक विद्यार्थ्यांसोबतही असेच वर्तन केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी विद्यार्थ्यांना बुधवारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाईल.