Karnataka Shocker: चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला 12 वर्षे घरात डांबून ठेवले; पोलिसांकडून सुटका, म्हैसूरमधील धक्कादायक घटना
पत्नीला 12 वर्षे घरात डांबून ठेवले (संग्रहित संपादित प्रतिमा)

कर्नाटकामधून (Karnataka) पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. इथल्या म्हैसूर (Mysuru) जिल्ह्यातील हिरेगे गावात एका व्यक्तीने आपल्या पत्नीला तिच्या चारित्र्याच्या संशयावरून तब्बल 12 वर्षे नजरकैदेत ठेवले. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बुधवारी रात्री घरावर छापा टाकून पीडित महिलेची सुटका केली आणि आरोपी सन्नलैयाला अटक केली. पिडीत महिला सुमा ही आरोपीची तिसरी पत्नी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. लग्नाच्या दिवसापासून पती तिच्यावर संशय घेत होता. लग्नाच्या पहिल्याच आठवड्यात त्याने तिला घरातील एका खोलीत कोंडून ठेवले होते.

अहवालानुसार, पतीचा छळ सहन न झाल्याने त्याच्या पहिल्या दोन बायका सोडून गेल्या होत्या. त्यानंतर आपल्या तिसऱ्या पत्नीचाही त्याने असाच छळ सुरु केला होता. पतीने दाराला तीन कुलुपे लावून पत्नीला कोणाशीही बोलू नकोस असे बजावले. तसेच तिला घराबाहेरील शौचालयाचा वापर करण्यास मनाई केली. तब्बल 12 वर्षे पत्नीने पतीचा छळ सहन केला. अखेर पीडितेच्या नातेवाईकाने पोलिसांना घटनेची माहिती दिली.

त्यानंतर एएसआय सुभान, वकील सिद्धप्पाजी आणि सामाजिक कार्यकर्त्या जशीला यांच्या पथकाने घरावर छापा टाकून पीडितेची सुटका केली. आरोपी पतीने पत्नीला धमकी दिली होती की, जर ती घराबाहेर पडली किंवा कोणाशी बोलण्याचा प्रयत्न केला तर तो तिचे मोठे नुकसान करेल. याआधी पीडितेच्या आईने आपल्या मुलीची सुटका करण्यासाठी स्थानिक नेत्यांशी संपर्क साधला होता, मात्र आरोपीने कोणालाही जुमानले नाही आणि त्याची क्रूरता सुरूच राहिली. (हेही वाचा: Madhya Pradesh Crime: भरदिवसा पतीने पत्नीचा गळा कापला त्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न; चौथाराम मंडीत नेमकं काय घडलं?)

पीडितेला आरोपीसोबत दोन मुले असून, त्यांना आता तिच्या पालकांच्या घरी पाठवण्यात आले आहे. पीडित सुमा म्हणाली, ‘माझ्या पतीने मला कोंडून ठेवले आणि मला माझ्या मुलांशी उघडपणे बोलू दिले नाही. विनाकारण तो मला वारंवार मारहाण करायचा. खोलीतील एका छोट्या खिडकीतून तो मला खायला द्यायचा. गावात सगळेच त्याला घाबरतात.’ आता या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.