कर्नाटकमधील (Karnataka) बेंगळुरूमध्ये (Bengaluru) नुकतेच गर्भपाताचे (Abortions) एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणी पोलिसांनी एका डॉक्टरसह इतर काही लोकांना अटक केली होती, ज्यांच्यावर आरोप होता की त्यांनी 900 बेकायदेशीर गर्भपात केले आहेत. आता या भ्रूणहत्या घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आरोपींनी पोलिसांना सांगितले की त्यांनी आतापर्यंत 3,000 स्त्री भ्रूणांचा गर्भपात केला आहे. बेंगळुरूचे पोलीस आयुक्त बी दयानंद यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले की तपासात असे दिसून आले आहे की, आरोपींनी आतापर्यंत 3,000 गर्भपात केले आहेत आणि गेल्या तीन महिन्यांतच 242 स्त्री भ्रूण मारले गेले आहेत.
आरोपींनी पैसे कमावण्यासाठी प्रतिवर्षी 1,000 गर्भपात करण्याचे लक्ष्य ठेवले होते. त्यांनी 20,000 ते 25,000 रुपये प्रति गर्भधारणा असे दर आकारले होते. 15 ऑक्टोबर रोजी बायप्पानहल्ली पोलिसांनी संशयास्पदरित्या फिरणारे वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हा घोटाळा उघडकीस आला. वाहन चालक थांबला नाही आणि त्याला पकडण्यासाठी पोलिसांना पाठलाग करावा लागला. पोलिसांनी जेव्हा हे वाहन पकडले तेव्हा दिसून आले की, गाडीतील लोक एका गर्भवती महिलेला कारमधून गर्भपातासाठी घेऊन जात होते.
त्यानंतरच्या चौकशीत आरोपीने गर्भपाताच्या रॅकेटबाबत खुलासा केला. पुढील तपासात पोलिसांनी आतापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे, ज्यात दोन डॉक्टर आणि तीन लॅब टेक्निशियन यांचा समावेश आहे. अटक केलेल्यांपैकी दोघांचा अपहरणाच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचेही समोर आले आहे या प्रकरणाचा तपास लवकरच पूर्ण होईल आणि सर्व काही उघड होईल, असे गृहमंत्री डॉ जी परमेश्वरा यांनी म्हटले आहे. (हेही वाचा: Woman Bites Husband: बायकोने रागाच्या भरात तोडला नवऱ्याच्या कानाचा लचका, दिल्ली पोलिसांकडून कारवाई)
तपासात असेही समोर आले आहे की, मंड्या जिल्ह्यातील गुळ उत्पादन युनिटमध्ये गर्भपात करण्यात आले होते. या ठिकाणी आरोपींनी प्रयोगशाळा आणि संबंधित सुविधा उभारल्या होत्या. मंड्याचे सहाय्यक आयुक्त शिवमूर्ती यांनी सांगितले की, जिल्हा आयुक्तांच्या आदेशानुसार गूळ उत्पादन युनिट जप्त करण्यात आले आहे.