Jharkhand CM Hemant Soren: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन अचानक गायब? ईडीकडून शोध सुरु
Hemant Soren | (Photo credit: Facebook)

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Jharkhand CM Hemant Soren) यांचा गेल्या 24 तासांहून अधिक काळ ठावठिकाणा नाही. ईडीकडेही (ED) त्यांच्या ठिकाण्याबाबत कोणतीही माहिती नाही. कथित जमीन घोटाळा प्रकरणात (Land Scam Case)हेमंत सोरेन सध्या ईडीच्या रडारवर आहेत. आज (30, जानेवारी) हेमंत सोरेन यांची ईडीकडून चौकशी होणार होती. मात्र हेमंत सोरेन हे गेल्या 24 तासांपासून त्यांचा कोणताही ठावठिकाणा नसल्याचे सांगण्यात येत आहे. ( हेही वाचा - Hemant Soren ED Interrogation: मनी लाँड्रिंग प्रकरणात हेमंत सोरेन यांची ईडीकडून चौकशी)

दरम्यान हेमंत सोरेन यांची बीएमडब्ल्यू कार ईडीने काल जप्त केलीय. त्यांच्या चालकाची चौकशी झालीय, मात्र त्याच्याकडूनही काही माहिती समोर आली नाहीये. सोरेन यांच्या शांती निकेतन, मोतीलाल नेहरू मार्गावरील घर आणि झारखंड भवन इथे ईडीची टीम गेली होती. मात्र सोरेन भेटू शकले नाहीत. 31 जानेवारीला सोरेन रांचीतल्या आपल्या निवासस्थानी चौकशीसाठी उपलब्ध असतील असं त्यांच्या कार्यालयाने ईमेलद्वारे ईडीला कळवलंय.

मुख्यमंत्री सोरेन हे अटकेच्या भितीने फरार झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. हेमंत सोरेन यांच्या कुटुंबातील सदस्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितलं की, ही संपूर्ण घटना हेमंत सोरेन यांना बदनाम करण्याचा कट आहे. हेमंत सोरेन यांनी ईडीला सातत्यानं उत्तरं दिली आहेत. 31 जानेवारी रोजी दुपारी एक वाजता राहत्या घरी जबाब नोंदवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.