'काश्मीर हा आमचा अंतर्गत विषय, इतरांनी त्यात नाक खुपसू नये'; इमरान खान-शी जिनपिंग मुलाखतीनंतर काश्मीरप्रश्नी चीनी घुमजावाला भारताकडून सडेतोड प्रत्युत्तर
Xi Jinping-Imran Khan | (Photo credit: Archived, edited, representative images)

काश्मीर (Kashmir) प्रश्नावर भारताचा शेजारी चीन या देशाने पुन्हा एकादा घुमजाव केले आहे. पाकिस्तानी पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) आणि चीन राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्यात झालेल्या संवादानंतर चीनने आपली भाषा बदलली. काश्मीर प्रश्नावर बोलताना शी जिनपिंग यांनी म्हटले की, काश्मीरमधील सध्यास्थितीवर चीनची बारीक नजर आहे. तसेच, भारताच्या एकतर्फी कारवाईचा आम्ही विरोध करतो असेही शी जिनपिंग यांनी म्हटले आहे. यावर चीनच्या बदलत्या भूमिकेवर भारतानेही सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. काश्मीर हा आमचा अंतर्गत मुद्दा आहे. त्यामुळे इतरांनी यात पडू नये, अशा सडेतोड भाषेत भारताने (India) चीनला सुनावले आहे.

पाकिस्तानी पंतप्रधान इमरान खान आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यत नुकतीच एक मुलाखत झाली. या मुलाखतीनंतर चीनकडून एक प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले आहे. या पत्रकात चीनने म्हटले आहे की, 'जम्मू-कश्मीरमधील सध्यास्थितीवर चीनची बारीक नजर आहे. काश्मीर मुद्द्यावरुन भारत आणि पाकिस्तान यांच्यात ऐतिहासिक गेली अनेक वर्षे वाद आहे. जो यूएन, चार्टर, आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषद आणि द्विपक्षीय चर्चेद्वारे सोडविण्यात आला पाहिजे. ज्यामुळे परिस्थीती चिघळते अशा कोणत्याही कोणत्याही एकतर्फी निर्णयाचा चीन विरोध करतो.'

दरम्यान, काही तासांपूर्वीच चीनने म्हटले होते की, काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्याती आंतर्गत मुद्दा आहे. काश्मीर प्रश्नावर चीनची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही दोन्ही देशांना विनंती करतो की, हा मुद्दा चर्चेद्वारे सोडविण्यात यावा. असे केल्याने दोन्ही देशांमध्ये विश्वास निर्माण होईल. तसेच, संबंधांमध्येही सुधारणा होईल. आंतरराष्ट्रीय सुमहांचीही अशीच आपेक्षा आहे. इतकी स्पष्ट भूमिका घेतल्यावर चीनने अवघ्या 24 तासात घुमजाव करत पलटी मारली आहे.

चीनच्या या घुमजावानंतर भारताने तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. चीनला खडेबोल सुनावताना भारताने म्हटले आहे की, जम्मू काश्मीर हे भारताचे आहे आणि भारतातच राहणार. काश्मीर प्रश्न हा आमचा अंतर्गत मुद्दा आहे. त्यामुळे इतरांनी त्यात लक्ष घालण्याची मुळीच आवश्यकता नाही. आमच्या आंतर्गत मुद्द्यांवर बोलण्याचा इतरांना काहीच अधिकार नाही. (हेही वाचा, आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानला पुन्हा दणका; हैद्राबाद निजामाच्या 300 कोटींच्या संपत्तीची मालकी भारताकडेच)

चीनच्या वक्तव्यावर भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले आहे की, आम्ही चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्यात झालेल्या मुलाखतीदरम्यानचे वृत्त पाहिले आहे. ज्यात काश्मीर मुद्द्यावर चर्चा झाल्याचा उल्लेख आहे. भारताची भूमिका आणि उद्दीष्ट स्पष्ट आहे की, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, होता आणि राहील. भारताची ही भूमिका चीनला माहिती आहे. भारताच्या अंतर्गत मुद्द्यावर बोलण्याचा कोणालाच अधिकार नाही, अशा स्पष्ट शब्दांत रवीश कुमार यांनी आपली भूमिका मांडली आहे.