Indian Navy Kurta-Pyjama Dress Code (Photo Credit : X)

Indian Navy Kurta-Pyjama Dress Code: समुद्रापासून भारताचे रक्षण करणारे नौदलाचे जवान (Indian Navy) आता मेस आणि खलाशी संस्थांमध्ये कुर्ता-पायजमा (Kurta-Pyjama) घालताना दिसणार आहेत. यासंदर्भातील आदेश भारतीय नौदलाने सर्व कमांड आणि संस्थांमध्ये जारी केल्याचे वृत्त आहे. मात्र, हा नवीन नियम पाणबुड्या आणि युद्धनौकांना लागू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अहवालानुसार, नवीन आदेशात म्हटले आहे की अधिकारी आणि खलाशांना ऑफिसर्स मेस आणि खलाशी संस्थांमध्ये औपचारिक शूज किंवा सँडलसह स्लीव्हलेस जॅकेट आणि कुर्ता-पायजमा घालण्याची परवानगी आहे.

मात्र, याबाबत काही कठोर नियमही तयार करण्यात आले आहेत. यामध्ये कुर्त्याच्या रंगापासून ते आकारापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. अहवालानुसार, कुर्ता सॉलिड टोनचा, गुडघ्यापर्यंत लांबीचा असावा. तसेच, स्लीव्हजसाठी बटण कफलिंक असावेत. पायजमाची रचना ट्राउझर्सच्या धर्तीवर असावी. कमरेवर खिसे असावेत. महिलांसाठीही तसे आदेश जारी करण्यात आले आहेत. महिला कुर्ता-चुरीदार किंवा कुर्ता-पलाझो घालू शकतात.

आतापर्यंत आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समधील पुरुष कर्मचाऱ्यांना कुर्ता-पायजमा घालण्यास मनाई होती. सध्या नौदलातील ऑफिसर्स मेसमध्ये नवीन ड्रेस कोड लागू करण्यात आला असून, लवकरच तो भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलातही लागू केला जाण्याची शक्यता आहे. नौदलाने मंजूर केलेल्या नवीन ड्रेस कोडचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय संस्कृती लक्षात घेऊन त्याची निवड करण्यात आली आहे. (हेही वाचा: Electoral Bonds: 'इलेक्टोरल बाँड्स' म्हणजे काय? देशात निवडणूक रोखे कधी आणि का आणले गेले? जाणून घ्या सविस्तर)

कुर्ता आणि पायजमा याशिवाय यामध्ये सदऱ्याचाही समावेश आहे. कुर्त्याचा रंग आकाशी निळा, पायजमा पांढरा आणि सदरा नेव्ही ब्लू रंगात आहे. ब्रिगेडियर हरदीप सिंग सोही यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर नौदलाने मंजूर केलेल्या नवीन ड्रेस कोडचा फोटो शेअर केला आहे. यासह नौदल नाविकांच्या श्रेणींना भारतीय नावे देण्याची तयारी करत आहे. याबाबत अधिकृतरित्या माहिती समोर आलेली नाही.