पश्चिम बंगाल (West Bengal) मध्ये दोन डॉक्टरांना मारहाण केल्याच्या प्रकरणी सुरु असणाऱ्या आंदोलनाला आता देशभरातील डॉक्टरांचा पाठिंबा मिळणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार येत्या 17 जूनला देशभरातील सर्वच डॉक्टर संप पुकारणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. जरी संप असला तरी त्यादिवशी देखील सर्व आपत्कालीन सुविधा सुरु असणार आहेत मात्र संपकाळात ओपीडी (OPD) आणि पॅथॉलॉजिकल सेवा बंद राहू शकतात असे सध्या सांगण्यात येत आहे.
पश्चिम बंगाल मध्ये डॉक्टरांना झालेल्या मारहाणीमुळे सध्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यांवर उतरून आंदोलने करायला सुरवात केली आहे. आयएमए म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशन ने घेतलेल्या पत्रकार परिषदेत देखील डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत प्रश्न करण्यात आला होता. तसेच या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी म्हणजे आज, 'अखिल भारतीय विरोध दिवस' पाळण्याची मागणी देखील केली जात होती. मुंबई: आज शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचे आंदोलन, वैद्यकीय सेवा बंद राहणार असल्याने रुग्णांना बसणार फटका
पश्चिम बंगाल हिंसेच्या विरोधात मागील चार दिवसांपासून डॉक्टरांनी बंड पुकारला होता.यामुळे अनेक रुग्णांची परवड होत होती त्यांच्या समस्या लक्षात घेऊन ममता बॅनर्जीने यांनी देखील गुरुवारी एसएसकेएम हॉस्पिटल ला भेट देऊन जर का डॉक्टर्स आपले काम करत नसतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला होता. तसेच चार तासात पुन्हा कामावर रुजू व्हा अन्यथा हॉस्टेल खाली करा अशी ताकीद दिली होती. पण ममता यांच्या या भूमिकेवर आक्षेप घेत डॉक्टरांच्या एका टीम ने राज्यपालांशी भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली.
नील रतन सरकार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (एनआरएस ) मध्ये शनिवारी एका रुग्नाच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबीयांनी डॉक्टरला मारहाण केली होती.ज्यामध्ये एका ज्युनिअर डॉक्टरला गंभीर जखम झाली होती. अशा प्रकारचे अनेक प्रसंग याआधी घडले आहेत. त्यामुळे संतापलेल्या डॉक्टरांनी आता या संपाची हाक दिली आहे.