पुढील 2 वर्षात देशाची टोल नाक्यांपासून सुटका; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा
Union Minister Nitin Gadkari (PC - ANI)

पुढील दोन वर्षात देशाची टोल नाक्यांपासून सुटका होणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केली आहे. तसंच रशियाच्या मदतीने केंद्र सरकार Global Positioning System (GPS) टेक्नोलॉजी वापर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं टोल उत्पन्न 1,34,000 कोटींपर्यंत वाढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या संबंधित विभागांच्या बैठकीनंतर नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. (FASTag ला आता Prepaid touch and Go Card चा पर्याय; NHAI ची 1 जानेवारीपासून नवी सुविधा)

पुढील 2 वर्षांत वाहनांच्या हालचालीवरुन त्यांचा टोल वाहन मालकाच्या लिंक बँक अकाऊंट मधून कट होईल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने गेल्या वर्षीपासून सुरु केलेल्या फास्ट टॅग नियमामुळे अनेक फायदे होत असल्याचे दिसून आले आहे. इंधनाची मोठी बचत होत असून व्यवहारात पारदर्शकता आली आहे. तसंच भ्रष्टाचारही कमी झाला होण्यास मदत होईल. केवळ फास्ट टॅगमुळे टोल उत्पन्नात 20 कोटींची वाढ झाली आहे, असे गडकरी म्हणाले. असे जरी असले तरी अजूनही अनेक वाहनांनी फास्ट टॅग लावलेलं नाही, हे देखील त्यांनी सांगितले.

टोल नाक्यांच्या व्यवहारात होणारा प्रचंड गैर व्यवहार आणि त्यातून निर्माण होणारी नागरिकांची नाराजी यातून टोलसाठी नवी प्रणाली तयार करण्याचा आमचा प्रयत्न होता. गेल्या वर्षभराच्या विचारविनिमयानंतर फास्ट टॅगची नवी प्रणाली लागू करण्यात आली. दरम्यान, फास्ट टॅग मुळे होणारे फायदे लक्षात घेत नागरिकांनी वाहनांना फास्ट टॅग लावणं उपयुक्त ठरेल. तसंच मुंबई सारख्या गर्दीच्या शहरांमध्ये टोल नाक्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. अशा परिस्थितीत नवी प्रणाली अतिशय फायदेशीर ठरेल, असेही ते म्हणाले.