देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Second Wave of Coronavirus) आली असून कोविड-19 (Covid-19) विरुद्धचा लढा अधिक तीव्र झाला आहे. भारताने आतापर्यंत 10 कोटींपेक्षा अधिक कोरोना लसीचे डोसेस दिल्याची माहिती आरोग्य मंत्र्यालयाकडून (Health Ministry) शनिवारी देण्यात आली आहे. 10 कोटी डोसेस केवळ 85 दिवसांत देऊन लसीकरणात भारत हा सर्वात वेगवान देश ठरला आहे. (Corona Vaccination: आजपासून देशात ‘टीका उत्सव’ ला सुरूवात; जास्तीत-जास्त लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य)
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत 85 दिवसांत 9.2 कोटी लसींचे डोसेस देण्यात आले होते. तर चीनमध्ये 6.1 कोटी डोसेस देण्यात आले होते. शनिवारी संध्याकाळी 7.30 वाजता झालेल्या मोजणीनंतर भारताने अजूनपर्यंत 10 कोटी 12 लाख 84 हजार 282 डोसेस दिले आहेत.
भारतातील मृत्यूदर सर्वात कमी व्हावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून योग्य ती पाऊलं उचलली जात आहेत. एकूण 10.12 कोटी लसींपैकी 90 लाखांहून आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यापैकी 55 लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोसही देण्यात आला आहे. 99 लाखांहून अधिक फ्रंटलाईन वर्कर्संना लसीचे डोस देण्यात आले असून 45-59 या वयोगटातील 3 कोटींहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. यासोबतच या वयोगटातील 6 लाख 37 हजार लोकांना लसीचा दुसरा डोसही देण्यात आला आहे. 60 वर्षावरील 3 कोटी 95 लाखांहून अधिक लोकांना लसीचा पहिला डोस तर 17 लाखांहून अधिक लोकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.
भारतात 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवक आणि फ्रंटलाईन वर्कर्संना लस देण्यात आली. लसीकरणाचा दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरु करण्यात आला असून या अंतर्गत 60 वर्षांवरील व्यक्ती आणि 45 वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना लस देण्यात आली. तर 1 एप्रिलपासून सुरु झालेल्या तिसऱ्या टप्प्यात 45 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या अपडेटनुसार, मागील 24 तासांत देशात 1,52,879 नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली असून 839 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 90,584 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या 11,08,087 सक्रीय रुग्ण आहेत.