Corona Vaccination: देशातील कोरोना विषाणूच्या संसर्गाने भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी सध्या देशात लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. कोरोना विरूद्ध सर्वात प्रभावी शस्त्र म्हणून लसीकरण मोहिमेकडे पाहिले जात आहे. ही मोहीम अधिक तीव्र करण्यासाठी आजपासून देशभरात 'टीका उत्सव' (Tika Utsav) सुरू होत आहे. देशातील जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करणे, हे या अभियानाचे लक्ष्य आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीपासून म्हणजेचं आजपासून देशभर टीका महोत्सवाला प्रारंभ होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार, 11 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान टीका उत्सव आयोजित केला जाईल. या अभियानात जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. 'टीका उत्सव' दरम्यान उत्तर प्रदेश, बिहारसारख्या अनेक राज्यांत पात्र लोकांना लसी देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ यांनीही लोकांना उत्सवाच्या काळात लस घेण्याचे आवाहन केले आहे.
देशभरात आजपासून 'टीका उत्सव' सुरू होणार आहे. यासंदर्भात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, आम्ही विशेष मोहिमेद्वारे अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना लसीकरण करणार आहोत. या अभियानाला नागरिकांनी साथ द्यावी आणि स्वत:चे लसीकरण करून घ्यावे. गुरुवारी देशातील कोरोनाची स्थिती आणि मुख्यमंत्र्यांसमवेत लसीकरण मोहिमेचा आढावा घेताना पंतप्रधान मोदींनी 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्वांना लस देण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. (वाचा - Uttar Pradesh: कोरोना लसीच्या ऐवजी रेबिजची लस देणारा फार्मासिस्ट निलंबित; जिल्हा मॅजिस्ट्रेट यांनी केली कारवाई)
ज्योतिबा फुले यांची जयंती 11 एप्रिल रोजी असून 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. यानिमित्त आपण टीका उत्सव आयोजित करू शकतो. तसेच टीका उत्सवाचे वातावरण तयार करू शकतो, असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं होतं.
दरम्यान, देशातील कोरोना संसर्गाच्या वाढत्या घटनांविषयी चिंता व्यक्त करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी पुन्हा युद्धपातळीवर काम करणे आवश्यक आहे. भारताने मागील वर्षी कोरोना विरुद्ध लढाई जिंकली होती. त्यामुळे देशातील नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही.