देशात कोरोना विषाणूचा कहर वाढत आहे, दिवसेंदिवस हजारोंच्या संख्येने संक्रमित रुग्ण समोर येत आहेत. याबाबत महाराष्ट्राने तर चीनलाही मागे टाकले आहे, अशात एक दिलासादायक बाब समोर येत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) अहवालात असे म्हटले आहे की, देशातील वेगवेगळ्या कंटेन्टमेंट झोन आणि हॉटस्पॉट्समधील लोकांपैकी, एक तृतीयांश लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे आणि नंतर ते स्वतः बरेही झाले आहेत. हा आयसीएमआर अहवाल अद्याप प्रसिद्ध झाला नाही. मात्र विश्वसनीय स्त्रोतांनुसार, अहवालात असे म्हटले आहे की, कंटेन्टमेंट झोन आणि हॉटस्पॉट्समधील लोकसंख्येच्या 15-30 टक्के लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे.
आयसीएमआरचा हा प्रारंभिक निष्कर्ष केंद्रीय कॅबिनेट सचिव आणि पंतप्रधान कार्यालय यांना पाठविण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद आणि इंदूरसारख्या शहरांमध्ये संसर्गाचे प्रमाण खूप जास्त असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. या शहरांमध्ये संक्रमणाचे प्रमाण देशातील इतर हॉटस्पॉट्सपेक्षा 100 पट जास्त आहे. आयसीएमआरने हाय रिस्क झोनमधील संक्रमणाची स्थिती जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले होते. त्यासंदर्भातील चाचणी प्रोटोकॉलनुसार मुंबई, ठाणे, पुणे, अहमदाबाद, सूरत, दिल्ली, कोलकाता, इंदूर, जयपूर आणि चेन्नई अशा देशातील 10 सर्वाधिक बाधित हॉटस्पॉट शहरांतून तपासणीचे नमुने घेण्यात आले आहेत.
प्रत्येक शहरातील 10 कंटेन्टमेंट झोनमधून 500 नमुने घेण्यात आले. याशिवाय देशातील 21 राज्यांमधील 60 जिल्ह्यांमधील 400 नमुनेही गोळा करण्यात आले. या सर्वेक्षणात असे दिसून आले की 15-30 टक्के लोकांना आधीच कोरोना विषाणूची लागण झाली होती व स्वतःहून ठीकही झाले. आयसीएमआरने आधीच सांगितले आहे की कोविड-19 बाबत देशातील 70 टक्के प्रकरणे या शहरांमधील आहेत. आयसीएमआरने हा अहवाल 10 हॉटस्पॉट शहरांमधून नमुने गोळा करून त्यांची तपासणी केल्यानंतर तयार केला आहे. मात्र अद्याप हा अहवाल अधिकृतपणे जाहीर झाला नाही.