Hyderbad Gangrape: डॉक्टर युवतीच्या सामुहिक बलात्कार प्रकरणी संतापाची लाट; आरोपींना कायदेशीर मदत न देण्याचा वकिलांचा निर्णय
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

तेलंगणाची राजधानी हैदराबाद (Hyderbad) येथे एका डॉक्टर युवतीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape), खून आणि त्यानंतर मृतदेह जाळून टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे देशात संतापाची लाट पसरली असून आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे. अशात हैदराबादच्या वकिलांनी या प्रकरणातील चारही आरोपींचा खटला न लढण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेबाबत सर्व आरोपींना कोणतीही कायदेशीर मदत देण्यात येणार नसल्याचे शादनगर बार असोसिएशनने शनिवारी जाहीर केले. तसेच पीडीतेच्या आईने आपला आक्रोश व्यक्त करत आरोपींना जिवंत जाळण्यात यावे अशी मागणी केली आहे.

पीडीत युवती कामावरून घरी परतत असताना तिची गाडी बंद पडली. तिने आपल्या बहिणीला फोन करून याची माहिती दिली. बहिणीने गाडी तिथेच सोडून टॅक्सीने घरी परत ये असे सांगितले. त्यानंतर मात्र तिचा फोन स्वीच ऑफ येऊ लागला. रात्री नातेवाईकांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र काही थांगपत्ता लागला नाही. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी पीडित महिलेचा जळालेला मृतदेह भुयारी मार्गाचा येथे आढळून आला. दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणासारखेच हे प्रकरण आहे. (हेही वाचा: हैदराबाद: महिला डॉक्टरवर बलात्कार केल्यानंतर जीवंत जाळल्याने देशभरातून संतापाची लाट)

या घटनेबद्दल तळागाळातून निषेध करण्यात येत आहे. अनेकांनी सोशल मिडियाद्वारे आपला संताप व्यक्त केला आहे. रंगारेड्डी जिल्ह्यातील वकिलांनी या घटनेतील आरोपींच्या वतीने खटला लढण्यास नकार दिला आहे. याबाबत या पीडीतेच्या कुटुंबानेही आपला संताप व्यक्त करत पोलिसांवर ताशेरे ओढले आहे. जेव्हा या युवतीचा फोन तिच्या बहिणीला आला होता त्यानंतर बहिणीने पोलिसांकडे मदतीची याचना केली होती. मात्र पोलिसांनी ही घटना आपल्या अखत्यारीत येत नाही असे सांगून कारवाई करण्यास टाळाटाळ केली. .पोलिसांनी योग्य वेळी पावले उचलली असती तर आज ही युवती जिवंत असती.