Hyderabad: 23 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या; YouTube चॅनलवर अपेक्षित व्ह्यूज मिळत नसल्याने उचलले टोकाचे पाऊल
Image used for Representational Purpose | (Photo Credits: File Photo)

ऑनलाइन गेमिंग (Online Gaming) आणि ऑनलाइन व्ह्यूज (Online Views) यांचा लोकांच्या मनावर इतका परिणाम झाला आहे की, यासाठी ते काहीही करण्यास तयार आहेत. गेमिंगचे व्यसन हे सध्याच्या युवा पिढीला मानसिकदृष्ट्या आजारी बनवत आहे, ज्याचे वाईट परिणाम समोर येत आहेत. या पार्श्वभुमीवर हैदराबादमधून (Hyderabad) आत्महत्येचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. गुरुवारी सैदाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाने आत्महत्या केली. यूट्यूब चॅनलवर फॉलोअर्स न वाढल्याने तरुण खूप दुःखी होता आणि याच तणावाखाली त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.

धीना असे या मृत मुलाचे नाव असून तो आयआयटी ग्वाल्हेरचा 23 वर्षीय विद्यार्थी आहे. सध्या हा तरुण ऑनलाइन क्लासेसच्या माध्यमातूनच शिक्षण घेत होता. सकाळी 5.30 वाजता त्याने आपल्या अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितले की, मृताचे सेल्फलो (SELFLO) नावाचे गेमिंगची संबंधित यूट्यूब चॅनल आहे. चॅनलवर त्याच्या फॉलोअर्सची संख्या वाढत नसल्याचे तो गेले काही दिवस निराश होता.

मिळालेल्या माहितीनुसार, अपार्टमेंटच्या वॉचमनला वरून काहीतरी पडण्याचा आवाज आला, त्यानंतर त्याने जवळ जाऊन पाहिले तर विद्यार्थी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी विद्यार्थ्याकडून सुसाईड नोटही जप्त केली आहे. या सुसाईड नोटमध्ये विद्यार्थ्याने लिहिले आहे की, त्याच्या यूट्यूब चॅनलवरील व्ह्यूअर्सच्या घटत्या संख्येमुळे आपण दु:खी आहोत. (हेही वाचा: Crime: क्रुरतेचा कळस! गरोदर सुनेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सासूला अटक)

यामध्ये विद्यार्थ्याने असेही सांगितले की, आई-वडिलांकडून करिअरचा सल्ला न मिळाल्याने तो निराश झाला आहे. पोलीस निरीक्षक एल रवी कुमार यांनी सांगितले की, विद्यार्थ्याचे पालक दोघेही नोकरी करतात. विद्यार्थ्याने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, त्याला एकटेपणा जाणवत होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. विद्यार्थ्याचा मृतदेह उस्मानिया रुग्णालयात हलवण्यात आला असून, तेथे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.