
कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये (Bengaluru) पती-पत्नीच्या नात्याबाबत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती-पत्नीने एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. महत्वाचे म्हणजे पतीने पत्नीवर, त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी ती 5,000 रुपये मागत असल्याचा आरोप केला आहे. पतीने सांगितले की त्याची पत्नी त्याच्यासोबत राहू इच्छित नाही आणि ती त्याला सतत धमकावते. याबाबत बेंगळुरू येथील तंत्रज्ञ श्रीकांत यांनी त्यांची पत्नी बिंदुश्रीविरुद्ध पोलीस तक्रार दाखल केली. या तरुणाने त्याच्या सासरच्या लोकांवरही मानसिक आणि शारीरिक छळाचे खळबळजनक आरोप केले आहेत.
लग्नाच्या तीन वर्षांनंतरही त्याची पत्नी त्याच्यासोबत व्यवस्थित राहत नव्हती आणि शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दररोज 5 हजार रुपये मागत होती, असा दावा तक्रारदाराने तक्रारीत केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे. तक्रारीत, या सॉफ्टवेअर इंजिनिअरने म्हटले आहे की, त्याचे लग्न 14 ऑगस्ट 2022 रोजी झाले होते. लग्नाआधीच पत्नी आणि तिच्या आईने पैशांची मागणी करायला सुरुवात केली. त्याच्या सासूने लग्नाच्या खर्चासाठी आधी 3 लाख रुपये खात्यात ट्रान्सफर करवले आणि 50 हजार रुपये रोख घेतले.
लग्नानंतरही त्यांच्या मागण्या आणि छळ सुरूच राहिला. एफआयआरमध्ये असा आरोप आहे की, लग्नापासून पत्नीने सामान्य वैवाहिक जीवन जगले नाही. जेव्हा जेव्हा पती शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा तेव्हा पत्नी आत्महत्या करण्याची धमकी द्यायची आणि मृत्यूची चिठ्ठी लिहून त्याला ब्लॅकमेल करायची. पत्नीने पतीच्या गुप्तांगांवर हल्ला करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही करण्यात आला. श्रीकांत म्हणतो, त्याच्या पत्नीने त्याला धमकी दिली होती की, जर त्याने तिला स्पर्श केला तर ती सुसाईड नोट लिहून आत्महत्या करेल. (हेही वाचा: HC on Wife Watching Porn: 'पत्नीचे एकट्याने पॉर्न पाहणे आणि हस्तमैथुन करणे गुन्हा नाही'; मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळली पतीची घटस्फोट याचिका)
दुसरीकडे बिंदुश्रीनेही तिच्या पतीवर अनेक आरोप केले आहेत. ती म्हणते की तिचा नवरा आणि सासरचे लोक तिला योग्य जेवण देत नाहीत आणि अनेकदा तिला मारहाण करतात. बिंदुश्रीने माध्यमांना सांगितले की, तिच्या वडिलांनी तिच्या लग्नात 45 लाख रुपये खर्च केले होते, पण तरीही तिला हुंड्यासाठी त्रास दिला जात होता. ती म्हणाली, सासरच्या लोकांच्या अशा वागण्यामुळे ती तिच्या आईवडिलांच्या घरी गेली होती, पण जेव्हा ती परत आली तेव्हाही तिचे सासरचे लोक तसेच वागू लागले. सध्या दोन्ही पक्षांच्या तक्रारी घेतल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.