गेल्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेलचे भाव (Fuel Prices) वाढल्याने अनेकांनी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडला आहे. इंधनाच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याने लोक इंधन कपात करण्याचे नवीन मार्ग शोधत आहेत. आता याबाबत एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. कर्नाटकातील (Karnataka) एका व्यावसायिकाने तंदुरुस्त राहण्यासाठी आणि इंधनाचे पैसे वाचवण्यासाठी चक्क घोडा (Horse) विकत घेतला आहे. विजयपुरा येथील 49 वर्षीय बाबूलाल चव्हाण असे या व्यावसायिकाचे नाव असून तो आता वाहतुकीसाठी चार पायांचे वाहन, गुजराती जातीचा घोडा वापरत आहे.
वृत्तानुसार, चव्हाण म्हणाले की, घोडा केवळ त्यांना तंदुरुस्त राहण्यासच मदत करीत नाही, तर यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर इंधनाचे पैसेही वाचत आहेत. चव्हाण हे फिटनेस फ्रीक आहेत आणि त्यांच्या जिमच्या फीसाठी दरमहा 4 हजार रुपये खर्च करतात. चव्हाण यांनी सांगितले की, ‘मी इंधन आणि व्यायामशाळेवर खर्च केलेल्या रकमेची गणना केली आणि लक्षात आले की घोडा खरेदी करणे अधिक किफायतशीर आहे. यामुळे मला तंदुरुस्त राहण्यास मदत होते, प्रदूषण कमी होते आणि पर्यावरण देखील स्वच्छ राहते.’
चव्हाण यांच्या कुटुंबाकडे एक कार आणि चार दुचाकी आहेत. याआधी पेट्रोल व डीझेलचे भाव परवडेनासे झाल्याने, औरंगाबादच्या सय्यद रझाक यांनीदेखील आपल्या मुलाला एक घोडा विकत घेऊन दिला होता. या मुलाने गाडीऐवजी घोड्यावरून रपेट मारण्यास सुरूवात केली आहे. (हेही वाचा: एलपीजी सिलेंडर 100 रुपयांनी स्वस्त, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी Indian Oil कडून ग्राहकांना दिलासा)
दरम्यान, तेल कंपन्यांनी आज सकाळी (शनिवार), 01 जानेवारी 2022 साठी पेट्रोल आणि डिझेलचे अद्ययावत दर जाहीर केले. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 01 जानेवारीला राष्ट्रीय स्तरावर वाहन इंधन, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.आर्थिक राजधानी मुंबईत इंधनाचा दर सर्वाधिक आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 110 रुपयांच्या आसपास आहे, तर डिझेल 94 रुपयांच्या पुढे आहे.