Python, प्रातिनिधिक प्रतिम (Photo Credits-Facebook)

हिमाचल प्रदेशच्या (Himachal Pradesh) ऊना जिल्ह्यातील ठाणे अंब अंतर्गत मुबारिकपूर गावात अजगराचा (Python) मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पोलिसांनी भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 च्या कलम 51 अंतर्गत गुन्हा नोंदवून 5 जणांविरूद्ध तपास सुरू केला आहे. या प्रकरणाची तक्रार वनविभागीय अधिकारी ऊना यांनी पोलिसांना दिली होती. आता जमावाने ठार मारलेल्या अजगराच्या प्रकरणात एक नवीन खुलासा झाला आहे. वाइल्ड लाइफच्या डॉक्टरांना अजगराच्या पोस्टमार्टमनंतर ती एक मादा असल्याचे आढळले आहे. तसेच तिच्या पोटातून त्यांनी जवळपास 49 लहान आकाराच्या अंडी प्राप्त केली आहेत. या मादा अजगराला मोठ्या प्रमाणावर मारहाण केली गेली होती, हे पोस्टमॉर्टममध्ये स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एसपी अर्जित सेन ठाकूर यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री उशिरा एक अजगर रस्त्यावरून जात होते आणि लोक त्याला त्रास देत होते. त्याचवेळी डीएसपी अंब सृष्टी पांडे रस्त्यावरून जात असताना त्यांनी लोकांची गर्दी पाहिली. त्या गाडीतून खाली उतरून आल्या व त्यांनी गर्दी हटवून अजगराला रस्ता ओलांडू दिले. यानंतर त्या निघून गेल्या, मात्र जेव्हा त्या परत आल्या तेव्हा त्यांनी रस्त्यात अजगर पडलेला पाहिले. जवळच एक दंडुकाही पडला होता, ज्याला रक्त लागले होते. लोकांनी अजगारावर हल्ला करून त्याला ठार मारले असल्याचे स्पष्ट झाले.

अजगराच्या डोक्याला आणि जबड्याला जोरदार चिरडण्यात आले होते, तर त्याच्या शरीरावर धारदार वस्तूने वार केले होते. त्यानंतर पांडे यांनी चौकशीचे आदेश दिले व पाच जणांवर गुन्हा दाखल केला. आता वनविभागाचे रेंज अधिकारी अशोक कुमार यांनी घटनेची पुष्टी करताना सांगितले की, पोस्टमॉर्टम दरम्यान मादा अजगराच्या पोटातून सुमारे 49 अंडी सापडली आहेत जी छोट्या आकाराची आहेत. मात्र, पोस्टमॉर्टमचा सविस्तर अहवाल येण्याची प्रतीक्षा आहे.