Ayman al-Zawahiri (file Image)

कर्नाटकसह भारताच्या विविध भागांमध्ये हिजाबवरून (Karnataka Hijab Row) सुरू असलेल्या वादामध्ये आता जागतिक दहशतवादी संघटनेने उडी घेतली आहे. या प्रकरणावर अल कायदाने (Al-Qaeda) भाष्य केले आहे. अल कायदाचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये संघटनेचा प्रमुख अयमान-अल-जवाहिरीने (Ayman al-Zawahiri) कर्नाटकातील हिजाबच्या वादामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या मुस्कान खानचे कौतुक केले आहे. इतकेच नाही तर व्हिडिओमध्ये जवाहिरीने मुस्कानला 'इंडियाज नोबल लेडी' असे संबोधले आहे. मुस्कानच्या स्तुतीसाठी त्याने एक कविताही पठन केली आहे.

हिंदू भारत आणि तेथील लोकशाहीचे वास्तव समोर आल्याचे जवाहिरीने म्हटले आहे. या व्हिडीओमध्ये तो मुस्कानला त्याची बहीण म्हणत आहे. त्याच बरोबर त्याने भारतीय मुस्लिमांना ‘या छळावर’ प्रतिक्रिया देण्यास प्रोत्साहित केले आहे. जवाहिरीने हिजाब वादावर भारतातील मुस्लिमांना उत्तर देण्यास सांगितले आहे. दुसरीकडे काश्मीर आणि इतर भागांना इस्लामिक झोन बनवण्याबाबत अल कायदा नेहमीच भाष्य करत आला आहे. अल कायदा काश्मीर आपले पुढचे लक्ष्य असल्याचे म्हणत आहे. आता हिजाब प्रकरणी व्हिडीओ जारी करत भारतीय मुस्लिमांना चिथावण्याचे काम अल कायदा करत आहे.

जवाहिरीचा हिजाब वाद आणि हिजाब गर्ल मुस्कान खानचे कौतुक करतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांचे वक्तव्य समोर आले आहे. असे व्हिडिओ निवेदन अल कायदाचे षड्यंत्र सिद्ध करते, असे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी बुधवारी सांगितले. गृहमंत्री म्हणाले की, गृह आणि पोलीस विभागाचे अधिकारी घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.

मंत्री ज्ञानेंद्र म्हणाले की, आम्ही हे सुरुवातीपासूनच म्हणत आलो आहोत आणि हिजाबच्या निर्णयादरम्यान हायकोर्टानेही हिजाब वादामागे काही छुपे हात असण्याची शक्यता वर्तवली होती. आता हे सिद्ध झाले आहे, कारण अल-कायदाने असा व्हिडीओ जारी केला आहे. गोष्टी कशा घडत आहेत, यातील दुवा काय आहे, असा सर्व गोष्टींचा पातास पोलीस करत आहेत. (हेही वाचा: अमेरिकेत न्यूयॉर्कच्या Times Square परिसरात पहिल्यांदा मुस्लिमांची 'Taraweeh' पडली पार)

दरम्यान, काश्मीरपासून केरळपर्यंत दहशतवादी समर्थक सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहेत आणि वेळोवेळी त्यांना अटकही होत आहे. अल कायदाची तालिबानशी जुनी मैत्री आहे. तालिबानने अमेरिकेशी करार केला  आहे की, ते अफगाणिस्तानची भूमी कोणत्याही देशाविरुद्ध वापरू देणार नाहीत. पण तालिबान आणि अल कायदा यांच्यातील मैत्री वाढली तर भारतासमोर मोठे आव्हान निर्माण होऊ शकते, ही भीती नाकारता येत नाही. अफगाणिस्तानमधील तालिबानचा विजय हा जिहादी चळवळीचा सर्वात मोठा विजय असल्याचे अल कायदाने म्हटले होते. जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा, अल कायदा यांसारख्या संघटना काश्मीरविरुद्ध कट रचू शकतात.