
तुमच्याकडे चारचाकी असो वा दुचाकी, सर्वांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (- HSRP) अनिवार्य करण्यात आल्या आहेत. केंद्रीय मोटार नियम 1989 च्या नियमानुसार सर्व वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ बसविणे बंधनकारक आहे. वाहन विक्रेत्याकडून 1 एप्रिल 2019 नंतर नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्यात येत आहे. मात्र 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार लावणे बंधनकारक केले आहे. देशातील बहुतेक राज्यात जुन्या वाहनांना अशा प्रकारची नंबर प्लेट लावण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्र राज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी लावण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यानुसार उच्चाधिकार समितीने 3 कंपन्यांचे दर अंतिम केले असून मान्य झालेल्या दरानुसार परिवहन आयुक्त कार्यालयाने कार्यारंभ आदेश जारी केले आहेत.
जाणून घ्या एचएसआरपी म्हणजे काय-
उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट म्हणजेच उच्च सुरक्षा नंबर प्लेट पूर्णपणे अॅल्युमिनियमपासून बनलेली असते. या प्लेटमध्ये वरच्या डाव्या कोपऱ्यात क्रोमियम-आधारित होलोग्राम आहे, ज्यामध्ये वाहनाबद्दलची सर्व माहिती आहे. यासोबतच, सुरक्षिततेसाठी एक अद्वितीय लेसर कोड देखील दिला जातो, जो प्रत्येक वाहनासाठी वेगळा असतो. हा कोड सहजासहजी काढता येत नाही. जुन्या वाहनांप्रमाणेच नवीन वाहनांवरही ते बसवणे आवश्यक आहे.
यामुळे वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे शक्य होणार आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनही सर्व वाहनांना ही नंबर प्लेट बसविणे अत्यावश्यक आहे. सर्व संबंधीत वाहनमालकांनी ही उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसविण्यासाठी परिवहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. वाहनधारकांनी या पोर्टलवर बुकींग करुन अपॉईंटमेंट घ्यावी आणि नंबर प्लेट बसवून घेण्यात यावी, असे आवाहन केले आहे. (हेही वाचा: Pune Swargate ST Bus Rape Case: बस स्थानकांचे सुरक्षा ऑडिट, गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस सिस्टम आणि पॅनिक बटणे; स्वारगेट एसटी बस बलात्कार प्रकरणानंतर सरकार ॲक्शन मोडवर)
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बुकिंग-
- वाहनमालकांनी www.transport.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन HSRP ऑनलाइन बुकिंग लिंकवर क्लिक करावे.
- अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून वाहनाच्या नोंदणी क्रमांकानुसार संबंधित कार्यालय निवडावे.
- वाहनाची माहिती आणि Vahan डेटाबेसमध्ये नोंदणीकृत मोबाइल नंबर प्रविष्ट करावा.
- HSRP निवडून सोयीस्कर तारीख व वेळ निश्चित करावी.
- निवडलेली तारीख आणि वेळेवर फिटमेंट सेंटरला भेट देऊन HSRP बसवून घ्यावी.
- नंबर प्लेट सेंटरवर जाऊन बसवून घ्यायची नसेल तर तुम्ही होम डिलिव्हरीचा पर्यायही निवडू शकता. हा पर्याय निवडल्यास गाडीला नंबरप्लेट घरी येऊन बसविण्यात येईल.
शेवटची तारीख-
महाराष्ट्र सरकारने हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्यासाठी नोंदणीची तारीख वाढवली आहे. पूर्वी, शेवटची तारीख 31 मार्च होती, आता ती 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. CMVR 1989 च्या नियम 50 आणि मोटर वाहन अधिनियम 1988 च्या कलम 177 नुसार, HSRP न बसवल्यास 1000 रुपये दंड आकारण्यात येईल.